पुणे / वार्ताहर :
पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथक एक आणि दोन यांनी मागील वर्षभराच्या कालावधीत वेगवेगळया कारवाई करुन एकूण पावणेचार कोटी रुपयांचे 823 किलो अमली पदार्थ जप्त केले आहेत. या अमली पदार्थाची पोलिसांकडून भट्टी जाळून विल्हेवाट लावण्यात येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी दिली आहे.
या अंमली पदार्थात एमडी, एलएसडी, ब्राऊनशुगर, अफू, चरस, गांजा, मॅफेड्रोन, कोकेन यासारख्या पदार्थांचा समावेश आहे. यामध्ये 818 किले गांजाचा समावेश आहे. चरस तीन किलो 105 ग्रॅम, हेरॉईन एक किले 110 ग्रॅम, कोकेन 252 ग्रॅम, मेफेड्रॉन 113 ग्रॅम यांचा समावेश आहे. त्याची बाजारभावानुसार किंमत पावणेचार कोटी रुपये आहे. पुणे शहरात प्रामुख्याने आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, मध्यप्रदेश आदी राज्यातून गांजाची सार्वजनिक वाहतुकीच्या माध्यमातून तस्करी मोठय़ा प्रमाणात होते. पुणे, मुंबई येथे त्याची बेकायदेशीर विक्री करणारी साखळी तयार झाल्याचे पोलिसांच्या तपासात उघडकीस आलेले आहे. गांजा सोबतच कोकेन, मेफेड्रोन या अंमली पदार्थांना ही मोठया प्रमाणात मागणी असल्याचे अमली पदार्थाच्या वेळोवेळीच्या कारवाईतून समोर आलेले आहे.
अधिक वाचा : उशिरा आलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा कक्षात प्रवेश नाही
पोलिसांनी जप्त केलेले पावणेचार कोटी रुपये किंमतीचे अंमली पदार्थ हे न्यायालयाच्या आदेशानुसार ड्रग डिस्पोजल कमिटीसह, वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या उपस्थितीत मुंढवा येथील भट्टीत नष्ट केले जाणार आहेत.