जुवारीनगर येथे 2018 साली घडली होती घटना
प्रतिनिधी / पणजी
नरकासूरासाठी देणगी देण्यास नकार दिला म्हणून कुमार बाबु रघुनाथ या 28 वर्षीय युवकाच्या नाकावर ठोसा लगावून त्याला जखमी केल्याच्या आरोपावरुन वास्को न्यायालयाने या प्रकरणातील जुवारीनगर परिसरातील आरापी रवी रेड्डी याला दोषी ठरवून शिक्षा ठोठावली.
दिवाळी सणाच्यावेळी रेश्मा रघुनाथ, कुमार रघुनाथ व त्यांची आई वास्को बाजारात खरेदी करुन जुवारीनगर येथे बसमधून उतरुन घरी जात असताना एक अज्ञात व्यक्ती त्यांच्यासमार येऊन नरकासूरासाठी देणगी मागू लागली. देणगी देण्यास नकार दिला तेव्हा एका अज्ञात व्यक्तीने अर्वाच्च शिव्या दिल्या आणि नंतर कुमार रघुनाथ याच्या नाकावर जोरदार ठोसा लगावला होता असे न्यायालयात सादर केलेल्या आरोपपत्रात म्हटलेले आहे.
त्यामुळे कुमार बाबु रघुनाथ याच्या नाकातून जोरदार रक्ताची धार सुरु झाली आणि त्यानंतर तो बेशुद्ध पडला होता. त्यानंतर बिर्ला पोलीस आवटपोस्टला जाऊन या प्रकरणी तक्रार करण्यात आली होती आणि पोलिसांनी जखमीला मडगावच्या सरकारी इस्पितळात नेऊन उपचार केले होते. रेश्मा हिच्या समोरच ही घटना घडलेली असल्यामुळे न्यायालयात तिने आरोपीला ओळखले होते.
या प्रकरणासंबंधी वेर्णा पोलिसांनी तपास करुन आरोपीविरुद्ध वास्को न्यायालयात भारतीय दंड संहितेच्या 325 तसेच 504 कलमाखालील गुन्ह्यासाठी आरोपपत्र सादर केले होते. ही घटना 5 नोव्हेंबर 2018 रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमाराला घडली होती. आरोपीने जखमी कुमार याच्या नाकावर ठोसा लगावून त्याला गंभीररित्या जखमी केले होते असे आरोपपत्रात म्हटलेले होते.
जखमी केल्यासंबंधीचा आरोप न्यायालयात सिद्ध झालेला असला तरी 504 कलमाखालील आरोप (शिव्या देणे) मात्र सिद्ध होऊ शकला नाही. परिणामी, वास्को न्यायालयाच्या न्या. शुभदा दळवी यांच्या न्यायालयाने आरोपी रवी रेड्डी याना भारतीय दंड संहेतेच्या 325 कलमाखाली दोषी ठरवून न्यायालय उठेपर्यंत न्यायालयात बसून राहण्याची शिक्षा आणि 10 हजार रुपयांचा दंड ठोठावला. (क्रिमीनल केस नं. 157/ एस/2018/बी)
दंडाची ही रक्कम न भरल्यास 6 महिने तुरुंगावास भोगण्याची शिक्षा वास्कोच्या या न्यायालयाने ठोठावली. 10 हजार रुपयांचा दंड भरल्यास दंडाची ही रक्कम जखमीला देण्यात यावी असेही न्यायालयाने आदेशात म्हटलेले आहे.