1 वर्षाचा कारावास व प्रत्येकी 1000/- रु दंड तसेच दंड न भरल्यात आणखीन एक महिना साधा करावास
इचलकरंजी / प्रतिनिधी
धर्मवीर संभाजी महाराज बलिदान मासनिमीत्त धर्मवीर संभाजी महाराज यांच्या पुजन केलेल्या प्रतिमेचे विटंबना करीत, एका तरुणाला शिवीगाळ करुन त्याला बेदम मारहाण केलेल्या खटल्याचा शुक्रवारी निकाल लागला. न्यायालयाने संदिप आनंदा कदम ( वय 25 ), अमोल आनंदा कदम ( वय 32, दोघे रा. अवधूतनगर, शहापूर, ता. हातकणंगले ) या दोघा सख्या भावाना दोषी ठरविले. दोघाना प्रत्येकी 1 वर्षाचा कारावास व प्रत्येकी 1000/- रु दंड तसेच दंड न भरल्यात आणखीन एक महिना साधा करावास अशी शिक्षा ठोठावली. या खटल्यात सरकारी वकील म्हणून व्ही. आर. गायकवाड यांनी काम पाहिले.
शहापूर ( ता. हातकणंगले ) येथील अवधूतनगरातील पाण्याच्या टाकीलगत राहणारा जगदीश बाबासो पाटील या तरुणाने 24 फेब्रुवारी 2018 रोजी घरासमोर धर्मवीर संभाजी महाराज बलिदान मासनिमीत्त धर्मवीर संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन केले होते. याच दिवशी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास तो घरासमोर मुलांसोबत बोलत थांबला होता. यावेळी आरोपीत संदिप कदम आणि अमोल कदम याचे वडील आनंदा महिपती कदम हे मोटारसायकलवरून जात असताना रस्त्याकडेला पडले. त्यामुळे जगदीश पाटील त्याना उठविण्यासाठी गेला असता कदम यांनी त्याला शिवीगाळ केली. शिवीगाळ का करता याचा जाब विचारलेल्या कारणावरुन आनंदा कदम, त्याची मुले संदिप कदम आणि अमोल कदम या तिघांनी जगदीश पाटील आणि त्याच्या भावास लाथाबुक्क्यांनी व यंत्रमागाच्या माऱ्याने बेदम मारहाण करून जखमी करीत, बलिदान मासनिमीत्त पुजन्यात आलेल्या धर्मवीर संभाजी महाराज यांच्या प्रतिमेची मोडतोड करून विटंबना केली होती. या प्रकरणी शहापुर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास पोलीस अंमलदार उदय करडे यांनी करून, तिघा संशयीता विरोधी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
या खटल्याची येथील न्यायालयात सुनावणी झाली. सुनावणी दरम्यान संशयीत आनंदा कदम मयत झाले. त्यामुळे त्याच्या विरोधी गुन्हा रद्द केला. तर दोघा संशयीता विरोधी खटला सुरु राहिला. सुनावणीअंती न्यायालयाने संदिप कदम, त्याचा सखा भाऊ अमोल कदम या दोघाना दोषी ठरविले. या दोघाना प्रत्येकी 1 वर्षाचा कारावास व प्रत्येकी 1000/- रु दंड तसेच दंड न भरल्यात आणखीन एक महिना साधा करावास अशी शिक्षा ठोठावली