पाच ऍकॅडमी कौन्सिल, एक सिनेट सदस्य झाले बिनविरोध : विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीसाठी 40 जणांचे अर्ज अवैध : 93 अर्ज मंजूर; पदवीधर आणि शिक्षक संघटनेची निवडणुकीत होणार चुरस
प्रतिनिधी/ सोलापूर
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर सिनेटच्या निवडणुकीत पुन्हा एकदा सुटा संघटनेचे वर्चस्व पाहावयास मिळाले आहे. ऍकॅडमी कौन्सिलमधून सुटा संघटनेचे पाच सदस्य बिनविरोध निवड झाले आहेत. यामध्ये एस. एम. कॉलेज अकलूजचे डॉ. हनुमंत आवताडे, दयानंद कॉलेजचे तानाजी कोळेकर, दयानंद महाविद्यालयाचे लक्ष्मी मुशन, शिवाजी शिंदे, वालचंद महाविद्यालयाचे आयेशा रंगरेज या बिनविरोध झाल्या आहेत. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातून सुटा आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची लढत होणार आहे.
दरम्यान, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीसाठी सर्व प्रवर्गातील एकूण 39 जागांसाठी 93 जणांचे उमेदवारी अर्ज छाननी प्रक्रियेत मंजूर झाले असून तर 40 जणांचे अर्ज नामंजूर झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी श्रेणिक शहा यांनी दिली. आता किती जण अर्ज माघार घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान यामध्ये सिनेटच्या सर्व प्रवर्गातील 39 जागांसाठी 133 उमेदवारी अर्ज आले होते. त्यापैकी 40 जणांचे अर्ज अवैध ठरले असून 93 जणांचे उमेदवार अर्ज पात्र ठरले आहेत. यामध्ये प्राचार्यांच्या दहा जागांसाठी नऊ अर्ज आले होते, सर्व अर्ज येथे मंजूर झाले आहेत. संस्थाप्रतिनिधींच्या सहा जागांसाठी एकूण 13 अर्ज दाखल झाले होते, त्यापैकी तीन अर्ज अवैध ठरले असून दहा अर्ज मंजूर झाले आहेत. शिक्षकांच्या 10 जागांसाठी 30 अर्ज आले होते, त्यापैकी 23 अर्ज मंजूर तर 7 अर्ज अपात्र ठरले आहेत. विद्यापीठ शिक्षकांच्या तीन जागांसाठी पाच अर्ज झाले होते, त्यापैकी तीन अर्ज मंजूर तर दोन अर्ज अपात्र ठरले आहेत.
पदवीधरच्या दहा जागांसाठी 76 जणांचे उमेदवारी अर्ज आले असून त्यापैकी 48 जणांचे अर्ज मंजूर तर 28 जणांचे अर्ज नामंजूर झाले आहेत. विद्यापरिषदेच्या आठ जागांसाठी नऊ अर्ज आले असून सात अर्ज मंजूर तर दोन अर्ज नामंजूर झाले आहेत.
16 सप्टेंबरपर्यंत अर्ज माघार घेण्याचा दिवस
अधिसभेच्या निवडणुकीसाठी 16 सप्टेंबर रोजी सायंकाळी पाचपर्यंत उमेदवारी अर्ज माघार घेता येणार आहे. 17 सप्टेंबर रोजी उमेदवारी अर्जावर आवश्यक असल्यास कुलगुरूंकडे अपील करता येणार आहे. रविवार, 18 सप्टेंबर रोजी पात्र उमेदवारांच्या नावाचे नोटिफिकेशन निवडणूक पोर्टलवर प्रसिद्ध केले जाणार आहे. त्यानुसार 29 सप्टेंबर रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी चारपर्यंत शहर व जिह्यातील 16 मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. 30 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरपर्यंत मतमोजणी होणार आहे.
सुटा संघटनेचे पारडे जड असणार
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत पुन्हा एकदा सुटा संघटनेचे वर्चस्व असणार असेही चित्र सध्या आहे. या निवडणुकीत संस्थाचालक संघटना, रिपाइं, संभाजी ब्रिगेड आणि युवासेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेण्याचे नियोजन केले आहे. त्याचबरोबर मागासवर्गीय संघटना, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद हे सुद्धा लढत देणार आहेत.
शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातून सुटा आणि विद्यार्थी विकास मंचची होणार लढत
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातून सुटा संघटना आणि विद्यार्थी विकास मंचमध्ये जोरदार लढत होणार आहे. शिक्षकमधून नऊ आणि पदवीधरमधून दहा जागांसाठी ही निवडणूक होणार आहे.