प्रतिनिधी /मडगाव
मडगाव पालिका भ्रष्टाचारात एवढी खोलवर रूतली आहे की, बैएस-4 इंजिन ट्रक घोटाळ्याचा गुंता अद्याप सुटलेला नसतानाच मडगाव पालिकेच्या खरेदीतील आणखी एक घोटाळा उघडकीस आणत आहोत, असे शॅडो कौन्सिलने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे. पालिकेने साफसफाईच्या कामांसाठी रिक्षा खरेदी केल्या आहेत. गंमत म्हणजे, 75 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी या वाहनांचे लोकार्पण केले, तर पालिका ही वाहने खरेदी करण्यासाठी आज 22 रोजी ठराव घेणार आहे. आणखी आश्चर्याची गोष्ट म्हणजे पालिकेने आधीच एजन्सीला 2 वाहनांसाठी 8 लाखांहून अधिक रक्कम भरल्याचे कळते, असा दावा शॅडो कौन्सिलचे निमंत्रक सावियो कुतिन्हो यांनी केला आहे.
मडगावमध्ये कायद्याचे राज्य आहे का आणि पालिका एवढय़ा मुक्तपणे निधीशी खेळ कशी करू शकते तसेच अशा फसवणुकीच्या बाबतीत सरकार बहिरे आणि मुके कसे होऊ शकते, असे प्रश्न कुतिन्हो यांनी पुढे केले आहेत. शॅडो कौन्सिलने पुराव्यांसह उघड केलेल्या विविध घोटाळ्य़ांच्या बाबतीत सरकारच्या निक्रियतेबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कुतिन्हो यांनी, आमदारांना शक्य तितक्या घोटाळय़ांमध्ये गुंतवून त्यांनी सत्ताधारी पक्षाकडे जाण्यासाठी योजना तयार करण्यात आली आहे का, असा प्रश्न मुख्यमंत्री आणि उच्चस्तरीय नोकरशाहीला केला आहे. वरील प्रकरणाची दक्षता खात्यामार्फत चौकशीची मागणी करणारी तक्रार दाखल करण्याचे कर्तव्य शॅडो कौन्सिल निश्चितपणे पार पाडेल, असा इशारा त्यांच्याकडून देण्यात आला आहे.