एकतर्फी आदेश न देण्यासाठी ‘कॅव्हेट’ : मोदी आडनाव प्रकरण
वृत्तसंस्था / नवी दिल्ली, अहमदाबाद
राहुल गांधींविरोधात बदनामीची तक्रार दाखल करणारे भाजप आमदार पूर्णेश मोदी यांनी बुधवारी सर्वोच्च न्यायालयात पॅव्हेट दाखल केले आहे. मोदी आडनाव प्रकरणात राहुल गांधी यांनी आव्हान याचिका दाखल केल्यास आपली बाजू ऐकून घेण्याची विनंती त्यांनी न्यायालयाला केली आहे. राहुल गांधी यांनी अद्याप आव्हान याचिका दाखल केली नसली तरी ते सर्वोच्च न्यायालयात जाण्याचे संकेत त्यांच्या वकिलांनी यापूर्वीच दिले आहेत.
गुजरात उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यास सर्वोच्च न्यायालयाने त्यांची बाजूही ऐकून घेतली पाहिजे, असे पूर्णेश मोदी यांचे यांचे म्हणणे आहे. आपली बाजू ऐकून घेतल्याशिवाय कोणताही आदेश काढू नये, असे त्यांनी सुचविले आहे. मानहानीच्या प्रकरणात 23 मार्च 2023 रोजी सुरतच्या सत्र न्यायालयाने राहुल गांधींना 2 वर्षांची शिक्षा सुनावली. मात्र, या निकालानंतर 27 मिनिटांनी त्यांना जामीन मिळाला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे 24 मार्चला राहुल गांधी यांना खासदारकीही गमवावी लागली होती. 7 जुलै रोजी गुजरात उच्च न्यायालयाने मानहानीच्या प्रकरणात राहुल गांधींच्या दोन वर्षांच्या शिक्षेला स्थगिती देण्यास नकार दिला. या प्रकरणाव्यतिरिक्त राहुल यांच्यावर किमान 10 खटले प्रलंबित आहेत. अशा परिस्थितीत सुरत न्यायालयाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्याची गरज नाही, असे स्पष्टीकरण उच्च न्यायालयाने दिले होते.