प्रतिनिधी,कोल्हापूर
Kolhapur : जपानी भाषा शिकून जपानमध्येच नोकरी मिळविण्याची कामगिरी कोल्हापूरच्या सुकन्येने केली आहे. पूर्वा नाडगोडा असे या विद्यार्थिनीचे नाव आहे. शिवाजी विद्यापीठाच्या विदेशी भाषा विभागात कोरोनाच्या संकटकाळात प्रवेश घेतलेल्या पूर्वाने कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडत अभ्यासक्रम पूर्ण केला. आवश्यक त्या परीक्षा पास झाल्यानंतर तिची फुजित्सु लिमिटेड या जपानी कंपनीमध्ये नियुक्ती झाली असून ती कंपनीच्या कामाकरिता दोन वर्षांसाठी जपानमधील टोकियो येथे प्रस्थान करीत आहे.
पूर्वा नाडगोडा हिने विदेशी भाषा विभागामधून जपानी भाषेचा सर्टिफिकेट व डिप्लोमा कोर्स पूर्ण केला आहे. त्याचबरोबर तिने विभागात दिल्या जाणाऱ्या जे.एल.पी.टी. या आंतरराष्ट्रीय परीक्षेच्या मार्गदर्शनाचा लाभ घेतला आणि ती परिक्षा उत्तीर्ण झाली. फुजित्सु लिमिटेड ही जपानी माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान उपकरणे आणि सेवा देणारी बहुराष्ट्रीय कॉर्पोरेट कंपनी आहे. 1935 मध्ये स्थापना झालेल्या या कंपनीचे मुख्यालय टोकियो येथे आहे. ती वार्षिक कमाईनुसार जगातील सहाव्या क्रमांकाची सर्वात मोठी माहिती तंत्रज्ञान सेवा प्रदाता आहे. पूर्वा नाडगोडा ही आता या कंपनीमध्ये इंजीनियर म्हणून काम करीत असून एप्रिलमध्ये दोन वर्षांकरिता कंपनीच्या कामाकरता जपानला जात आहे. त्या निमित्ताने विदेशी भाषा विभागातर्फे तिचा सत्कार करण्यात आला. या सत्कारप्रसंगी बोलताना पूर्वा नाडगोडा म्हणाली, माझ्या या यशामध्ये शिवाजी विद्यापीठाचा खूप मोठा वाटा आहे. विभागातर्फे शिकविले जाणारे अभ्यासक्रम हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे आहेत. नोकरी मिळविण्याकरिता त्याचा मोठा फायदा होतो. वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम करणे ही आता फक्त मेट्रो शहरातील मत्तेदारी राहिलेली नसून कोल्हापूर सारख्या छोट्या शहरात शिकूनही अशा संधी मिळू शकतात.
विदेशी भाषा विभागप्रमुख डॉ. मेघा पानसरे म्हणाल्या, पूर्वा नाडगोडाने मिळवलेले हे यश शिवाजी विद्यापीठासाठी भूषणावह आहेच, पण इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे. एक इंजिनियर व तरुण माता अशा व्यावसायिक आणि कौटुंबिक दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळणारी पूर्वा ही जिद्द, मेहनत आणि क्षमतेच्या बळावर आपले करिअर घडवू शकली. पश्चिम महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी विदेशी भाषा क्षेत्रात आता भरपूर नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांनी 12 वी नंतर इतर शिक्षण घेत असतानाच कोणतीही एक विदेशी भाषा शिकल्यास भावी आयुष्यात त्यांना त्याचा खूप फायदा होतो, हे पूर्वाच्या अनुभवावरुन सिद्ध झाले आहे.
कार्यक्रमाच्या अखेरीस विद्यार्थ्यांनी पूर्वा नाडगोडा यांच्याशी मुक्त संवाद साधला. शिक्षण आणि करिअर संदर्भात अनेक प्रश्न विचारून माहिती घेतली. या कार्यक्रमास विविध विद्याशाखांतील विद्यार्थी, शिक्षक, तसेच पूर्वाचे पती पवन नाडगोडा उपस्थित होते. जपानी भाषा शिक्षिका स्नेहल शेट्यो यानी उपस्थितांचे आभार मानले.
शिवाजी विद्यापीठा या भाषा शिकविल्या जातात…..
शिवाजी विद्यापीठाच्या विदेशी भाषा विभागामध्ये रशियन, जर्मन, जपानी, फ्रेंच व पोर्तुगीज या भाषा शिकविल्या जातात. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय परीक्षांचेही मार्गदर्शन केले जाते. याचा कोल्हापूर आणि परिसरातील विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन विभाग प्रमुख डॉ. मेघा पानसरे यांनी केले आहे.
Previous Articleपुण्यात टपाल खात्यातील अधिकाऱ्यांकडून 24 लाखांचा अपहार
Next Article डॉक्टरांप्रमाणे शिक्षकांनाही मिळणार उपाधी !
Abhijeet Khandekar
Meet Abhijeet Khandekar : a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. With a Master's degree in Journalism from Shivaji University, Abhijeet specializes in political news, entertainment, and local content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives. Connect with Abhijeet for collaborations and captivating content that informs and entertains.