विधानसभेत पुरस्कार प्रदान : आजवरच्या कामगिरीची पोचपावती
प्रतिनिधी /बेळगाव
हल्याळचे आमदार व माजी मंत्री आर. व्ही. देशपांडे यांना 2022 सालासाठी सर्वोत्कृष्ट आमदार पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. विधानसभाध्यक्ष विश्वेश्वर हेगडे-कागेरी यांनी बुधवारी कामकाजाला सुरुवात होताच या पुरस्काराची घोषणा केली.
मुख्यमंत्री बसवराज बोम्माई, विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या, कायदा व संसदीय व्यवहारमंत्री जे. सी. माधुस्वामी यांच्या उपस्थितीत बुधवारी सकाळी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. बुधवारी कामकाजाला सुरुवात होताच सभाध्यक्ष विश्वेश्वर हेगडे-कागेरी यांनी या पुरस्काराची घोषणा करून आर. व्ही. तथा रघुनाथराव विश्वनाथराव देशपांडे यांनी आजवर विधानसभेत दिलेल्या योगदानाबद्दलची माहिती दिली.
दहा मुख्यमंत्र्यांसमवेत काम
आर. व्ही. देशपांडे यांचा जन्म 1947 चा. बीए, एलएलबीपर्यंतचे शिक्षण घेऊन हल्याळ भूविकास बँकेचे अध्यक्ष म्हणून त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. 1983 ला पहिल्यांदा आमदार म्हणून ते निवडून आले. आतापर्यंत आठवेळा आमदार झालेल्या आर. व्ही. देशपांडे यांना अधिकाधिक वेळा आमदार बनण्याचा मान जातो. लघु उद्योग, अवजड व मध्यम उद्योग, कृषी, बागायत, महसूल, कौशल्य विकास आदी खात्यांचे मंत्रिपदही त्यांनी यशस्वीपणे हाताळले आहे. माजी मुख्यमंत्री रामकृष्ण हेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी वाटचाल केली आहे. आजवर सुमारे दहा मुख्यमंत्र्यांसमवेत त्यांनी काम केले आहे, असे सभाध्यक्षांनी सांगितले.
विरोधी पक्षनेते, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष, हंगामी सभाध्यक्ष म्हणूनही त्यांनी सेवा बजावली आहे. संसदीय कार्यपद्धतीत एका चौकटीत राहून प्रभावीपणे विचार मांडण्याचा अनुभव, ज्ञान त्यांना आहे. ते एक उत्कृष्ट लोकप्रतिनिधी असून, तिरुपती, तिरुमला देवस्थानचे ट्रस्टी, हल्याळ येथे तुळजा भवानी देवस्थान उभारून धार्मिक व आध्यात्मिक क्षेत्रातही त्यांनी आपला ठसा उमटवला आहे, असे सांगत सभाध्यक्षांनी त्यांचा गौरव केला.
मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी सर्वोत्तम आमदार पुरस्काराबद्दल त्यांचे अभिनंदन केले. त्यांची या पुरस्कारासाठी निवड झाल्याने पुरस्काराचा सन्मान वाढला आहे. आपले वडील कै. एस. आर. बोम्माई व त्यांचे घनिष्ठ संबंध होते. आपल्या राजकीय जीवनात त्यांनी नीतीमत्ता व मूल्यांची जपणूक केली आहे. दहा वर्षांहून अधिककाळ उद्योगमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. त्यांची मैत्री, आत्मियता ही पक्षातीत आहे, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी त्यांचा गुणगौरव केला.
इतरांना स्फूर्तिदायक-प्रेरणादायी ठरणारा पुरस्कार
विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या म्हणाले, अशा पद्धतीने सर्वोत्तम आमदाराची निवड करून त्यांना पुरस्कार देणे इतरांना स्फूर्तिदायक व प्रेरणादायी ठरते. देशपांडे एक अजातशत्रू व्यक्तिमत्त्व आहे. ते अधिवेशनात सक्रिय भाग घेतात, असे सांगून आर. व्हीं. चे अभिनंदन केले.
जनतेच्या आशीर्वादाने इथपर्यंत पोहोचलो!
पुरस्कार स्वीकारल्यानंतर आर. व्ही. देशपांडे म्हणाले, आजच्या सामाजिक जीवनात आपण राजकारणी आहोत, असा परिचय करून द्यायला भीती वाटते. जनमानसात राजकीय नेत्यांबद्दल पूर्वी जी आदराची भावना होती, ती आज नाही. चूक आपलीही आहे आणि जनतेचीही आहे. निवडून आल्यानंतर गरीब, कष्टकऱ्यांना मदत करणे हे मदत नव्हे तर ते आपले कर्तव्यच असते. आई-वडील व हल्याळच्या जनतेच्या आशीर्वादाने आपण इथपर्यंत पोहोचलो असल्याचे त्यांनी सांगितले.