एका देशाच्या सैन्याने दुसऱ्या देशावर हल्ला करणे आणि तो आपल्या ताब्यात घेणे अशा घटनांची आपल्याला माहिती आहे. सध्याच्या काळात असे फारसे होत नाही, पण इतिहास काळात असे सर्रास घडत असे. पण प्राण्यांनीं एक देश आपल्या कबजात घेतला होता, असे कोणी सांगितल्यास आपल्याला आश्चर्य वाटल्याखेरीज राहणार नाही. अर्थात हे देश ताब्यात घेणे आपण रुढार्थाने घ्यायचे नसून संख्यात्मक पद्धतीने त्याचा अर्थ लक्षात घ्यायचा आहे.
ऑस्ट्रेलिया हा देश सर्वांच्या परिचयाचा आहे. तेथे अलिकडच्या काळात सशांची संख्या एवढी वाढली आहे की, हा देश जणू सशांनी ताब्यातच घेतला आहे, असे बोलण्याचा प्रघात पडला आहे. ऑस्ट्रेलियाची लोकसंख्या 2 कोटीच्या घरात आहे. पण येथील सशांची संख्या 20 कोटींपर्यंत पोहचली आहे. हा गेल्यावर्षीचा आकडा आहे. तसे पाहिल्यास ससा हा ऑस्ट्रेलियाचा मूळचा स्थानिक प्राणी नाही. ब्रिटीशांनी या भूखंडाचा शोध लावल्यानंतर काही काळाने शिकारीचा खेळ खेळण्यासाठी 24 ससे ब्रिटनहून येथे आणण्यात आले. पण आता त्यांची संख्या इतकी वाढली की तो चिंतेचा विषय बनला. सशांना येथे भरपूर खायला घातले जात असल्याने आणि त्यांना कोणताही नैसर्गिक शत्रू नसल्याने त्यांची संख्या भरमसाठ वाढल्याचे तज्ञांचे मत आहे. आपल्याकडे जशी भटक्या कुत्र्यांची समस्या आहे, तशीच ऑस्ट्रेलियात सशांची आहे असे म्हणता येते.
अखेरीस या समस्येतून मार्ग काढण्यासाठी तेथील सरकारला ससे मारण्याचा कायदा करावा लागला. या कायद्याला अर्थातच प्राणीमित्र संघटनांकडून विरोध झाला. तथापि, सश्यांच्या संख्येची समस्या इतकी वाढली होती, की त्यांना मारण्यावाचून गत्यंतर नव्हते. आता त्यांची संख्या नियंत्रित करण्यासाठी कायदा केल्याने यावर्षी ती काही प्रमाणात कमी झाली आहे. तथापि, ती पूर्णत: नियंत्रणात आणण्यासाठी काही वर्षे जावी लागणार आहेत. मानवनिर्मित असंतुलनामुळे ही समस्या निर्माण झाल्याचे पर्यावरणस्नेही संघटनांचे मत आहे.