राधानगरी तलाव बॅक वॉटर परिसरातील तिन्ही ऋतूतील पर्यटन स्थळ
तरूण भारत – कौलव
राधानगरी जलाशयाचे बॅक वॉटरमुळे निर्माण झालेल्या प्रति ‘बीच‘ या सर्वांचा नजराणा अनुभवायचा असेल तर सह्याद्रीच्या रांगेतील हसणे परिसराला भेट देऊन उन्हाळी पर्यटनाचा अनुभव कुटुंब आणि मित्र परिवार सहलीमार्फत मे महिन्यात द्विगुणित करण्यासारखा आहे. राधानगरी आणि दाजीपूर परिसराला आवर्जून भेट पर्यटनप्रेमींनी दिली पाहिजे.
राधानगरी तालुक्यातील राधानगरी ,दाजीपूर आणि काळम्मावाडी परिसर निसर्ग सौन्दर्याने नटलेला परिसर आहे.या परिसरात कोणत्याही दिवसात पर्यटनाचा आनंद लुटता येतो.सध्याचा उन्हाळा म्हणजे पर्यटकाना अनेक ठिकाणी जाऊन निसर्गातील नजराणे, जैवविविधता यांचे अनुभव घेण्याची सुवर्णसंधी आहे.वाढलेली फुलपाखरांची संख्या, सायंकाळच्या वेळी काजवा किड्यांचे थवे, दिवसभर मिळणारा करवंदे,
आंबा, फणस, नेर्ली, चिखल्या, जांभळे असा रानमेवा भरभरून लगडलेला परिसर पर्यटकांना साद घालत आहे.
फेजीवडे गावाजवळ भोगावती नदीवर राजर्षी शाहू महाराजांनी लक्ष्मी जलाशय बांधणी केली. या जलाशयामुळे कोल्हापूर जिह्यात हरित क्रांती झाली.फेजीवडे गावापासून हसणे,दाजीपूरपर्यंतचा बावीस किलोमीटर अंतराचा परिसर निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. या सौदर्यांत आणखी भर घालणारी बाब म्हणजे राधानगरी जलाशयाचे बॅक वॉटर ,विस्तीर्ण क्षेत्र लाभलेला लक्ष्मी जलाशय. कोकणला जोडणाऱ्या कोल्हापूर -राधानगरी- फोंडा या राज्यमार्गावर हसणे गावापासून दाजीपूर पर्यंत पाच किलोमीटर अंतरावर राधानगरी जलाशयाचे बॅक वॉटर मनमोहित करून टाकते. रस्त्याच्या शेजारी बॅक वॉटर चा परिसर ,पाण्यावर उसळणारे लाटांचे तरंग ,थंडगार वाऱ्याचा पाण्यावरून येणारा प्रवाह जणू समुद्र किनाराच भासतो. एकदिवशीय सहल कुटुंबियांच्या समावेत असो किंवा मित्रपरिवार यांच्यासोबत असो जंगली सहलीचा मनमुराद आनंद लुटता येतो.स्वच्छ पाणी, स्वच्छ हवा वातावरणातील गारवा, ट्रेकिंगचा अनुभव मिळवून देतो.
हसणे परिसरात बॅक वॉटरचे बीच आहेतच. शिवाय शेजारील जंगलात देवराई जागोजागी पाहण्यास मिळतात.हसणे गावच्या उत्तर बाजूला लघु तलाव आहे या तलावा शेजारी देवराई आहे.येथिल लोकांनी देवाच्या नावाने संरक्षित ठेवलेले लहानसे जंगल आहे.या जंगलात फिरण्याचा आनंद कांही औरच आहे.विविध प्रकारच्या वनस्पती ,फुलपाखरे असा हिरवागार परिसर पर्यटकाना पुन्हा पुन्हा देवराइत येण्यास भाग पाडतो. शांत निसर्गाची अनुभूती देणारा परिसर म्हणजे देवराई.
या परिसरात दहा देवराई निसर्गाचा वारसा जपत आहेत.हसणे गावच्या लघु तलाव शेजारी गंगामाऊली देवराई,दाजीपूर येथे उगवाई देवी देवराई.तर शेजारच्या भागात फराळे येथील डोंगराई देवराई ,वाकी येथील वाकी देवराई,सावरदे, पडसाळी, पाट पन्हाळा, मिसळवाडी याठिकाणी देवराई सुस्थितीत असून दुर्मिळ वनस्पती आणि प्राण्यांचे आगार पाहण्यास मिळते. देवराईची जंगले पर्यटकाना आणि अभ्यासकांसाठी आकर्षण ठरत आहेत.
राधानगरी जलाशयाचा विस्तीर्ण परिसर सुमारे बावीस किलोमीटर अंतरात वसलेला असूनराधानगरी,हसणे,दाजीपूर,राऊतवाडी असा गोलाकार प्रवास निसर्गाची सौन्दर्य अनुभुती देतो. सोबत कोकण दर्शन,राधानगरी लक्ष्मी जलाशय,राऊतवाडी धबधबा परिसर,मधुमक्षिका पालन केंद्र आदी ठिकाणे पाहता येतात.राधानगरी नेचर क्लब,बायसन क्लब मधील संघटक ,कार्यकर्ते मदतीसाठी येतात. शिवाय गाईड राधानगरी शहरात मिळत असल्याने पर्यटकाना सुलभता निर्माण झाली आहे.
कसे जाल
कोल्हापूर -राधानगरी-हसणे परिसर —-75 किलोमीटर .
कोकणाकडून फोंडा ते हसणे परिसर —-25 किलोमीटर.
भोजनाची व्यवस्था , भाऊसाहेब हॉटेल, खिंडी व्हरवडे. राधानगरी शहर येथे अनेक हॉटेल उपलब्ध,घरगुती भोजन ठिकठिकाणी सुविधा आहेत.