खासदार इरण्णा कडाडी यांची केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांना विनंती
बेळगाव : बेळगावात रेडिओ एफएम केंद्रे आणि वाहिन्या स्थापन कराव्यात, अशी विनंती राज्यसभेचे खासदार इरण्णा कडाडी यांनी केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांना निवेदन देऊन केली आहे. मी बेळगाव जिल्ह्यातील नागरिकांच्यावतीने हे पत्र लिहिलेले असून या मागणीकडे लक्ष देऊन त्याला पाठिंबा द्यावा, असे आवाहन त्यांनी केंद्रीय मंत्र्यांना केले आहे. कर्नाटकाची दुसरी राजधानी म्हणून ओळखले जाणारे बेळगाव हे उत्तर कर्नाटकातील एक प्रमुख शहर आहे. त्याला प्रचंड ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि आर्थिक महत्त्व आहे. यामुळे ते प्रसारण सेवांच्या विस्तारासाठी एक आदर्श स्थान आहे. शहराचा समृद्ध वारसा, वैविध्यपूर्ण लोकसंख्या आणि मोक्याचे स्थान असल्यामुळे ते प्रादेशिक उपक्रम, व्यापार आणि सांस्कृतिक देवाणघेवाण यांचे केंद्र बनले आहे, याकडे कडाडी यांनी लक्ष वेधले आहे.
बेळगावमध्ये रेडिओ एफएम केंद्रे आणि वाहिन्या सुरू केल्याने अनेक महत्त्वाचे उद्देश साध्य होणार असून माहितीचा प्रसार होऊ शकेल. बेळगावला चैतन्यशील आणि वैविध्यपूर्ण सांस्कृतिक वारसा आहे. रेडिओ कार्यक्रमांचा वापर स्थानिक संगीत, अन्य कला आणि सांस्कृतिक परंपरांना प्रोत्साहन देण्यासाठी केला जाऊ शकतो. रेडिओ हे शैक्षणिक प्रसारासाठी, विशेषत: बेळगावच्या आसपासच्या ग्रामीण भागांच्या दृष्टीने प्रभावी साधन बनू शकते. तऊणांना ज्ञान व कौशल्यांसह सक्षम करण्याच्या दृष्टीने शैक्षणिक सामग्री, भाषाविषयक धडे आणि करिअर मार्गदर्शन याविषयी त्यावरून कार्यक्रम प्रसारित करता येतात, असे कडाडी यांनी म्हटले आहे. एफएम केंद्रे आणि वाहिन्यांच्या स्थापनेमुळे रोजगाराच्या संधी निर्माण होतील आणि या प्रदेशातील आर्थिक विकासाला चालना मिळेल, असेही त्यांनी नमूद केले. मंत्री ठाकूर यांच्या पाठिंब्याने ही मागणी पूर्ण होऊन बेळगावातील रहिवाशांचे जीवन समृद्ध करण्याच्या आणि शहराच्या सांस्कृतिक आणि आर्थिक विकासाला चालना देण्याच्यादृष्टीने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरेल, असा विश्वास कडाडी यांनी व्यक्त केला आहे.