काहेरमध्ये आंतरराष्ट्रीय रेडिओलॉजी दिन साजरा
बेळगाव : शतकाहून अधिकचा इतिहास असलेल्या रेडिओलॉजी तंत्रज्ञानामुळे रोगनिदान सुलभ झाले आहे. अलीकडे व्यापक आरोग्यसेवांना फायदेशीर ठरले आहे. अनेक प्रसंगात त्वरित व परिणामकारक उपचार सुरू करण्यासाठी रेडिओ तरंगही सहकारी ठरतात, असे काहेरचे उपकुलगुरु डॉ. नितीन गंगाणे यांनी सांगितले. केएलई संस्थेचे डॉ. प्रभाकर कोरे इस्पितळ व वैद्यकीय संशोधन केंद्राच्या रेडिओलॉजी विभागाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय रेडिओलॉजी दिन कार्यक्रमाचे उद्घाटन करून ते बोलत होते.
छिद्राच्या माध्यमातून उपचार शक्य
यापूर्वी शस्त्रक्रियेसाठी रुग्णाच्या शरीराचा अधिकाधिक भाग नुकसानग्रस्त होत होता. आता बदलत्या तंत्रज्ञानामुळे केवळ एका छिद्राच्या माध्यमातून उपचार करणे शक्य झाले आहे. खासकरून नसांसंबंधीच्या आजारात हे उपचार परिणामकारक आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
वैद्यकीय उपकरणे देशातच तयार करण्यासाठी सहकार्य करात
यावेळी इस्पितळाचे वैद्यकीय संचालक कर्नल डॉ. एम. दयानंद म्हणाले, बहुतांश वैद्यकीय उपकरणे परदेशांतून आयात केली जातात. संशोधनाच्या माध्यमातून आपल्याच देशात ती तयार करण्यासाठी संशोधकांनी सहकार्य करावे. असे झाल्यास रुग्णांच्या खिशाला परवडेल अशा दरात रोगनिदान करणे शक्य होणार आहे. यावेळी डॉ. भरत एम. पी., काहेरचे कुलसचिव डॉ. एम. एस. गणाचारी, जेएनएमसीच्या प्राचार्या डॉ. एन. एस. महांतशेट्टी, कॅन्सर इस्पितळाचे वैद्यकीय संचालक डॉ. एम. व्ही. जाली, डॉ. राजेश पवार, डॉ. व्ही. एम. पट्टणशेट्टी, डॉ. राजेंद्र माळी, डॉ. प्रदीप पाटील, डॉ. अश्विन पाटील, डॉ. पूजा कवटगीमठ, डॉ. नवीन मुलीमनी, डॉ. अभिनंदन रुगे, डॉ. प्रदीप गौडर, डॉ. अभिमान बालोजी आदी उपस्थित होते.