लोकसभा सदस्य गमावल्यानंतर पहिल्यांदाच संसदेत
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
संसद सदस्यत्व रद्द केल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी बुधवारी पहिल्यांदाच संसदेत पोहोचले. काँग्रेस खासदारांच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी ते येथे आले होते. येथे अर्धा तास थांबून ते सोनिया गांधी यांच्यासोबत कारमधून निघाले. या बैठकीतील चर्चेचा तपशील प्रसारमाध्यमांसमोर उघड करण्यात आला नाही. तसेच राहुल किंवा सोनिया गांधी या दोघांनीही बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधला नाही.
केरळमधील वायनाड मतदारसंघाचे नेतृत्त्व करणाऱ्या राहुल गांधी यांचे संसद सदस्यत्व 24 मार्च रोजी दुपारी 2.30 च्या सुमारास रद्द करण्यात आले होते. त्यानंतर बुधवारी प्रथमच ते एखाद्या बैठकीला संसद भवनात उपस्थित राहिले. विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेत सध्या फारसे कामकाज होऊ शकलेले नाही. सभागृहाचे कामकाज वारंवार तहकूब होत असले तरी सत्ताधारी आणि विरोधक यांच्या आपापल्या पातळीवर बैठकांचे सत्र सुरू आहे.
बुधवारी लोकसभेत काँग्रेसच्या खासदारांनी ‘लोकशाही वाचवा’चे पोस्टर दाखवत अध्यक्षांसमोर काळे कपडेही दाखवले. काँग्रेसचे नेते सलग तिसऱ्या दिवशी काळे कपडे घालून संसदेत पोहोचले होते. मात्र, राहुल गांधी मात्र पांढऱ्या टी-शर्टमध्ये काँग्रेसच्या बैठकीला आले होते.
अहंकारामुळे राहुलनी गमावली खासदारकी : अश्विनी वैष्णव
राहुल गांधी यांना त्यांच्या अहंकारामुळे लोकसभा सदस्यत्व गमवावे लागल्याचा दावा केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी केला. आपण एका विशिष्ट कुटुंबात जन्मलो आहोत, त्यामुळे या देशावर राज्य करणे हा त्यांचा जन्मसिद्ध हक्क आहे, असे त्यांना वाटते. त्यामुळेच काही चुकीचे विचार त्यांच्या मनात येतात, असेही ते म्हणाले.