वृत्तसंस्था /नवी दिल्ली
काँग्रेस खासदार राहुल गांधी हे गुरुवारी सकाळी दिल्लीतील आनंद विहार रेल्वेस्थानकावर कुलींदरम्यान पोहोचले. या भेटीदरम्यान राहुल गांधींनी कुलींच्या समस्यांवर चर्चा केली. तसेच कुलींचा (हमाल) गणवेश अन् बिल्ला परिधान करून प्रवाशांचे सामानही उचलले आहे. राहुल गांधी यांची ही कृती पाहून कुली देखील चकित झाले. याचबरोबर राहुल गांधी यांनी कुलींच्या विश्रांतीगृहातील खराब एलईडी ट्यूबलाइट्स बदलण्याची सूचना प्रशासनाला केल्यावर यासंबंधी त्वरित अंमलबजावणी झाली. राहुल गांधी हे सकाळी साडेसात वाजता रेल्वेस्थानकावर पोहोचले. यानंतर राहुल गांधी यांच्यानजीक सर्व कुलींना बोलाविण्यात आले. राहुल यांनी यावेळी कुलींच्या समस्या जाणून घेतल्या आहेत. संबंधित स्थानकावर 165 कुली असून त्यांच्याकरता स्थानकावर अत्यंत छोटे विश्रांतीगृह आहे. मागणी करूनही त्याचा आकार वाढविला जात नसल्याची तक्रार कुलींच्या समुहाचे प्रमुख हारुन यांच्यासह इतरांनी केली.
जगाचा भार उचलणाऱ्यांसाठी कुठलीच पेन्शन व्यवस्था नाही. ठराविक वयानंतर कुली काम करू शकत नाहीत, मग त्यांचा उदरनिर्वाह अडचणीत येतो असे कुली अब्दुल गफ्फूर यांनी राहुल गांधींना उद्देशून सांगितले. तसेच त्यांनी रेल्वेप्रवासासाठी मोफत पासची संख्या वाढविण्याची मागणी केली आहे. कुलींसोबत चर्चा केल्यावर राहुल गांधी यांनी त्यांच्या विश्रांतीकक्षाची पाहणी केली. राहुल गांधी हे तेथून गेल्यावर प्रशासनाने तेथील खराब ट्यूबलाइटस उतरवून त्याजागी नव्या लाइट्स लावल्या आहेत.