केरळच्या अलाप्पुझा येथे भारत जोडो यात्रा
वृत्तसंस्था / अलाप्पुझा
काँग्रेसची भारत जोडो यात्रा सध्या केरळमध्ये आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोमवारी येथील नौका शर्यतीत भाग घेतला आहे. ही नौकाशर्यत अलाप्पुझा येथे पार पडली असून याला ‘पूर्वेकडील व्हेनिस’ म्हणून ओळखले जाते. अलाप्पुझा येथे राहुल गांधी यांनी पर्यटन उद्योगाच्या प्रतिनिधींसोबत चर्चा करत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत.
राहुल गांधी यांनी नौका शर्यतीत भाग घेतल्यानंत त्याचा एक व्हिडिओ काँग्रेसने ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. तत्पूर्वी सोमवारी सकाळी राहुल यांनी स्थानिक मच्छिमारांशी संवाद साधला होता. इंधनाच्या वाढत्या किमती आणि महागाईने मच्छिमारांच्या उपजीविकेवर प्रतिकूल प्रभाव पडला आहे. उत्पन्न वाढत नसले तरीही खर्च वाढत चालला आहे. महागडय़ा शिक्षणामुळे मुलांच्या भविष्याबाबत हे मच्छिमार चिंतेत आहेत. भारत जोडो यात्रा देशातील प्रत्येक घटक, प्रत्येक व्यक्तीसाठी असल्याचे उद्गार राहुल गांधी यांनी यावेळी काढले आहेत.
केरळच्या सुंदर भूमीतील प्रवास हा याचे समृद्ध वैविध्य पाहण्याचा हा अनुभव होता. अलाप्पुझाने मला काही नवे दाखवून दिले आहे. येथील शेतीबद्दल जाणून घेतले. हवामान बदलाबद्दल राज्य तसेच केंद्र सरकारची भूमिका असंवेदनशील आहे. हवामान बदलामुळे शेतकरी प्रभावित झाले असल्याचे राहुल यांनी नमूद केले आहे. भारत जोडो यात्रेने आतापर्यंत 200 किलोमीटरहून अधिक अंतर कापले आहे.