लंगर हॉलमध्ये केली भांडी धुण्याची सेवा
वृत्तसंस्था/ अमृतसर
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोमवारी अमृतसर गाठून सुवर्ण मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यानंतर त्यांनी लंगर हॉलमध्ये भांडी धुण्याची सेवा केली. यावेळी त्यांनी डोक्मयावर निळ्या रंगाचा स्कार्फ परिधान केला होता.
राहुल गांधी यांनी सोमवारी सुवर्ण मंदिराला दिलेली भेट खासगी स्वरुपाची असल्याचे सांगण्यात आले. या काळात कोणताही राजकीय कार्यक्रम ठेवण्यात आला नव्हता. या दौऱ्यादरम्यान पंजाबचे काँग्रेस नेतेही त्यांच्या स्वागतासाठी दाखल झाले नव्हते. त्यांच्या दौऱ्यापूर्वी पंजाब पोलिसांनी सुरक्षा व्यवस्थाही कडक केली होती. यापूर्वी भारत जोडो यात्रेदरम्यान त्यांनी सुवर्ण मंदिरला भेट दिली होती. भारत जोडो यात्रेदरम्यान अमृतसरचा त्यांच्या मार्गात समावेश नव्हता, तरीही पंजाबमध्ये यात्रा सुरू होण्यापूर्वी ते अनपेक्षितपणे अमृतसरला पोहोचले. पगडी घालून त्यांनी सुवर्ण मंदिरात दर्शन घेतले होते.
पंजाबमध्ये काँग्रेस आमदार सुखपाल खैरा यांच्या ड्रग्ज प्रकरणातील अटकेमुळे सध्या संताप व्यक्त होत आहे. खैरा हे जवळपास 8 वर्षे जुन्या ड्रग्ज प्रकरणात अडकले असून राजकीय सूड घेण्यासाठी ही अटक करण्यात आल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. याचदरम्यान राहुल गांधी अमृतसरमध्ये दाखल झाल्यामुळे वेगवेगळे तर्कवितर्क व्यक्त केले जात होते. तसेच जागावाटपातील चर्चांवरून ‘इंडिया’ आघाडीचे सदस्य असलेल्या काँग्रेस आणि आम आदमी पार्टी या दोन्ही पक्षांमध्ये खडाजंगी सुरू आहे. ‘इंडिया’ आघाडीच्या स्थापनेनंतर राहुल गांधी यांचा हा पहिलाच पंजाब दौरा आहे. पंजाबमधील काँग्रेस नेते ‘इंडिया’ आघाडीला सातत्याने विरोध करत आहेत.