कुडची, निलजी, मुतगे, शिंदोळी, बसरीकट्टीतील शेतकऱ्यांतून समाधान
वार्ताहर /सांबरा
तालुक्याच्या पूर्व भागातील बसवण कुडची, निलजी, मुतगे, शिंदोळी, बसरीकट्टी भागाला रविवारी सायंकाळी चारच्या सुमारास मुसळधार पावसाने झोडपून काढले. त्यामुळे बघता बघता शिवारामध्ये पाणी साचले तर सांबरा, बाळेकुंद्री परिसरात तुरळक प्रमाणात पाऊस झाला. पूर्व भागामध्ये आठवडाभरा पूर्वी पाऊस झाला होता. त्यानंतर पावसाने ओढ दिल्याने उष्म्यामध्ये कमालीची वाढ झाली होती. अशातच रविवारी सायंकाळी चारच्या सुमारास मुसळधार पावसाने झोडपून काढल्याने शिवारामध्ये पाणी साचून राहिले होते. हा पाऊस पेरणीसाठी लाभदायक असल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.
मुतगे येथील बाजारावर परिणाम
मुतगे येथे दर रविवारी आठवडा बाजार भरतो. रविवारी सायंकाळी चारच्या सुमारास पावसाला प्रारंभ झाला. बघता बघता पावसाने रौद्ररूप धारण केले. त्यामुळे भाजी विक्रीसाठी व खरेदीसाठी आलेल्या व्यापारी व नागरिकांची मोठी गैरसोय झाली. येथील मेन रोड नजीकच्या चौकामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचून राहिले. त्यामुळे नागरिकांची गैरसोय झाली.
मेंढपाळांची एकच तारांबळ
रविवारी अचानक आलेल्या पावसामुळे मेंढपाळांची एकच तारांबळ उडाली. दरवर्षी साधारण पाऊस सुरू होण्यापूर्वी मेंढपाळ बकरी घेऊन डोंगर भागात जातात. मात्र अजून म्हणावा तसा पाऊस सुरू नसल्याने अनेक मेंढपाळ आपल्या बकऱ्यासोबत पूर्व भागांमध्ये आहेत. रविवारच्या पावसामुळे त्यांना उंच भागाचा आधार घ्यावा लागला.