घर, रेशनकार्ड, गॅरंटी योजना, शेतजमिनींबाबत तक्रारींचा भडिमार
बेळगाव : जनता दर्शन कार्यक्रमात नागरिकांच्या समस्यांचे निवारण केले जाईल, यासाठी नागरिकांनी आपल्या तक्रारी मांडण्यासाठी कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले होते. यामुळे तक्रारी दाखल करण्यासाठी व आपल्या समस्यांचे निवारण करून घेण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली होती. यामध्ये दिवसभरात 713 तक्रारी नागरिकांनी नोंदविल्या होत्या. राज्य सरकारकडून विविध गॅरंटी योजना जारी केल्या आहेत. त्यापैकी अन्नभाग्य योजनेतून तांदळाऐवजी रेशनकार्डधारकांच्या बँक खात्यावर पैसे जमा करण्याचे सांगण्यात आले होते. दोन महिने उलटले तरी पैसे जमा झाले नाहीत. सदर रक्कम त्वरित मिळावी, यासाठी मोठ्या प्रमाणात तक्रारी नोंदविण्यात आल्या. तर काहीजणांची रक्कम नेमक्या कोणत्या बँक खात्यावर जमा झाली आहे, याचा थांगपत्ताच नाही. सदर रक्कम मिळाली नसल्याची तक्रारही यावेळी करण्यात आली. पाच वर्षांपूर्वी घराची भिंत कोसळून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याबाबत जिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्याकडे वारंवार तक्रारी करूनही नोंद घेण्यात आली नाही. केवळ आश्वासने देऊन पाठवून दिले जात आहे. घर पडले असतानाही भरपाई देण्यास अधिकाऱ्यांकडून विलंब करण्यात येत आहे. घरासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे, मात्र बँक खात्यावर निधी वर्ग करण्यात आला नाही, अशा घरासंदर्भातील तक्रारी मोठ्या प्रमाणात नोंदविण्यात आल्या.
भाग्यलक्ष्मी योजनेसाठी अर्ज करण्यात आले असले तरी अनेक जणांना योजनेचा लाभ मिळाला नाही. अर्ज करूनही दोन महिन्यांचा कालावधी उलटत आला तरी याची दखल घेण्यात आली नाही. आधारकार्ड, रेशनकार्ड अपडेट करून घेऊनही अद्याप निधी मिळाला नसल्याच्या अनेक महिलांनी तक्रारी नोंदविल्या आहेत. अर्धांगवायूचा झटका आल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविणे कठीण झाले आहे. आर्थिक भार चालविण्यासाठी उद्योग-व्यावसाय करण्याकरिता कर्ज मंजूर करण्यात यावे, अथवा चहा दुकान चालविण्यासाठी आर्थिक मदत देण्यात यावी, अशा तक्रारीही अनेक जणांनी नोंदविल्या. रेशनकार्डसाठी अर्ज करून दोन वर्षांचा कालावधी उलटला असून सरकारच्या योजनांचा लाभ घेणे अशक्य होत आहे. आर्थिक परिस्थिती कठीण असून सरकारने योजनांचा लाभ करून द्यावा, अशी मागणीही यावेळी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली. तक्रारी ऐकून घेऊन जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना तत्काळ बोलावून समस्यांचे निवारण करण्याची सूचना केली.
लाभार्थ्यांना मदतीचे वितरण…
सरकारी योजनांचा लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांना साहित्याचे वितरण करण्यात आले. शेतकऱ्यांना पंपसेट, शालेय विद्यार्थ्यांना कामगार खात्याकडून शालेय साहित्य, वैद्यकीय खर्चासाठी आर्थिक मदतीचे धनादेश वितरण करण्यात आले.