हंगामातील एकूण पाऊस 134 इंच : अजूनही मुसळधार पावसाची शक्यता
पणजी : गोव्यात गेले दोन तीन दिवस सर्वत्र मुसळधार कोसळणाऱ्या पावसाचा रविवारी काही भागात वेग ओसरला आणि गोव्याला चक्रिवादळाचा असलेला धोकाही टळला आहे. या हंगामात 134 इंचापेक्षा जास्त पावसाची नोंद गोव्यात झाली आहे. वार्षिक सरासरीपेक्षा हा पाऊस जास्त आहे. हवामान खात्याने शनिवार पाठोपाठ रविवारीही ‘रेड अलर्ट’ जारी केला होता. सुटीचा दिवस असल्याने व पावसाची संततधार चालूच राहिल्याने लोकांनी घरातच रहाणे पसंत केले. परंतु गोव्यात आलेल्या पर्यटकांनी हळुवार पावसाची मजा लुटली. मागील चार दिवसांपासून सातत्याने पाऊस पडत असल्याने राज्यातील अनेक भागात जनजीवन विस्कळीत झाले असून अद्यापही ते पुर्वपदावर आलेले नाही. अनेक ठिकाणी झाडे, छप्पर व इतर पडझडीच्या घटना घडल्या आहे. सत्तरी तालुक्याच्या काही ठिकाणी नद्यांच्या पाण्याची पातळी वाढली होती. काही रस्ते पाण्याखाली गेले होते. रुमडा वाडा-वास्को येथे दरड कोसळून काही घरांचे नुकसान झाले, तर महाखाजन-धारगळ येथे राष्ट्रीय महामार्ग 66 जवळ दरड कोसळली, सुदैवाने कोणतीही हानी झाली नाही. ग्रामीण भागात तर झाडे पडण्याच्या घटना घडल्या असून त्याचा परिणाम म्हणून अनेक भागातील वीजपुरवठा खंडीत झाला आहे. काही भागात तर दोनतीन दिवस वीजपुरवठा बंद आहे. त्याचा परिणाम होऊन पाणी पुरवण्यावरही परिणाम झाल्याचे दिसून आले.
नियंत्रण कक्ष हेल्पलाईन
नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन हवामान खात्याने केले आहे. आपत्कालीन स्थिती उद्भवल्यास 0832-2419550, 0832 -2225383, 0832-2794100 या हेल्पलाईनवर (नियंत्रण कक्ष) संपर्क साधावा असे कळवण्यात आले आहे. गेल्या 24 तासातील पाऊसाची नोंद पुढीलप्रमाणे :- (इंचात) पणजी 1.68, मडगाव 1.57. सांगे 2.89. केपे 2.37, मुरगाव 1.58, दाबोळी 1.15, काणकोण 1.71, सांखळी 3.60, जुने गोवे 2.50, फोंडा 2.95, पेडणे 3.10, म्हापसा 3.11.
चक्रिवादळाचे संकट टळले…
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे गोवा राज्यावर पावसाचे तसेच चक्रिवादळाचे सावट आले होते. पाऊस काही प्रमाणात कमी झाला आणि त्याचबरोबर गोव्यावरील चक्रिवादळाचे संकटही टळले असून ते पुढे गेले आहे. त्यामुळे जनतेला दिलासा मिळाला आहे.