वृत्तसंस्था/ बेंगळूर
येथे सुरू असलेल्या आयटीएफ महिलांच्या टेनिस स्पर्धेत भारताच्या अंकिता रैना आणि प्रार्थना ठोंबरे यांनी महिला दुहेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. तसेच या स्पर्धेत वैदेही चौधरीने एकेरीच्या पात्र फेरीत विजयी सलामी दिली.
या स्पर्धेत मंगळवारी झालेल्या महिला दुहेरीच्या सामन्यात भारताची द्वितीय मानांकित जोडी अंकिता रैना आणि प्रार्थना ठोंबरे यांनी या स्पर्धेत वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश मिळालेल्या जर्मनीच्या शर्मादा बाळू आणि सारा रिबेका सेकुलिक यांचा 5-7, 6-3, 10-6 अशा सेट्समध्ये पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली. हा सामना दोन तास चालला होता. त्याचप्रमाणे या सपर्धेत महिला दुहेरीत तृतीय मानांकित भारताची ऋतुजा भोसले आणि स्वीडनची जॅक्वेलेनी अवाद यांनीही उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवताना कोरियाच्या चोई व तैपेईच्या हेसन यांचा 6-4, 6-2 असा पराभव केला. मात्र भारताच्या प्रगती नारायण व प्रतिभा नारायण यांना मात्र हार पत्करावी लागली. महिला एकेरीच्या पहिल्या फेरीत सामन्यात जपानच्या इकुमी येमाझेकीने तृतीय मानांकित सेकुरा होसोगीचा 7-5, 6-3 असा पराभव करत विजयी सलामी दिली. महिला एकेरीच्या प्रमुख फेरीमध्ये स्थान मिळविण्यासाठी सुरू असलेल्या पात्र फेरीच्या पहिल्या सामन्यात भारताच्या वैद्येही चौधरीने जपानच्या नेमागेटाचा 6-2, 6-0 असा पराभव करत दुसरी फेरी गाठली.