टीचर्स कॉलनी, सह्याद्रीनगर भागात प्रचार
वार्ताहर /किणये
1956 साली मराठी बहुभाषिक भाग अन्यायाने तत्कालिन म्हैसूर राज्यात डांबण्यात आला. मराठी भाषिकांवर झालेल्या अन्यायाच्या विरोधात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातून आवाज उठविण्यात आला. देशाच्या इतिहासात इतकी वर्षे चाललेला हा लढा ऐतिहासिक आहे. सीमाप्रश्नाचा खटला न्यायालयात आहे. लोकशाहीमार्गाने चाललेल्या या लढ्याला न्यायदेवता नक्कीच आम्हा सीमाबांधवांना यश देणार. मात्र तोपर्यंत आपण रस्त्यावरची लढाई सुरूच ठेवली पाहिजेत आणि सीमाप्रश्नाच्या लढ्याला बळ देण्यासाठी म. ए. समितीचे उमेदवार निवडून आणणे गरजेचे आहे. त्यासाठी समितीचे आर. एम. चौगुले यांना विजयी करा, असे आवाहन म. ए. समितीचे नेते मनोज पावशे यांनी टीचर्स कॉलनी, सह्याद्रीनगर भागातील नागरिकांना केले. म. ए. समितीचे अधिकृत उमेदवार आर. एम. चौगुले यांचा प्रचार सोमवारी टीचर्स कॉलनी, सह्याद्रीनगर भागात समितीच्या नेतेमंडळींनी व कार्यकर्त्यांनी केला. यावेळी या भागातील नागरिकांना मार्गदर्शन करताना मनोज पावशे बोलत होते. ते पुढे म्हणाले, सीमाभागातील नागरिकांवर सातत्याने अन्याय, अत्याचार करण्यात येतात. मराठी बहुभाषिक भाग असतानाही कन्नडची सक्ती करण्यात येते. सरकारी कार्यालयांवर केवळ कन्नड भाषेमध्ये फलक लावण्यात येतात. यामुळे इथल्या मराठी बांधवांना याचा त्रास सहन करावा लागतो आहे. आपली मातृभाषा असलेल्या मराठीतून परिपत्रके मिळत नाहीत. या सर्वांचा विचार करता होणाऱ्या अन्यायाविरोधात आवाज उठविण्यासाठी समितीचे उमेदवार निवडून येणे गरजेचे आहे. त्यासाठी आर. एम. चौगुले यांना निवडून आणा, असेही पावशे म्हणाले.
प्रत्येकाच्या घरी जाऊन समितीचा प्रचार केला आणि आर. एम. चौगुले यांना निवडून आणा, असे आवाहन या भागातील वरिष्ठ नेतेमंडळींनी केले. टीचर्स कॉलनी, शिवनगर, चिकूबाग, ओंकारनगर, बंजारा कॉलनी, सह्याद्रीनगर, बुडा स्कीम नं. 40, जयनगर व विजयनगरातील काही भाग या परिसरात सोमवारी चौगुले यांचा जोरदार प्रचार करण्यात आला. प्रचाराला या भागातील नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. आपण चौगुले यांना पूर्णपणे पाठिंबा देणार असल्याचे काही स्थानिक नागरिकांनी सांगितले. य् ाा प्रचारफेरीत डी. बी. पाटील यांनी समितीचे उमेदवार आर. एम. चौगुले यांचे चिन्ह घागर हे असून घागर समोरील बटण दाबून चौगुले यांना विजयी करा आणि विधानसभेत पाठवा, असे सांगितले. यावेळी के. के. मरुचे, सूर्याजी पाटील, रजपूत, हिरामणी भातकांडे, बालकृष्ण दफेदार, प्रकाश बेळगुंदकर, के. एम. पाटील, परशराम आपटेकर, कल्लाप्पा चौगुले, अनिल हेगडे, मधु बेळगावकर, डी. एम. चौगुले आदींसह या भागातील समितीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.