अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य : रसिकांना भुरळ
प्रतिनिधी/ बेळगाव
खडक गल्ली येथील नवसाला पावणाऱ्या खडक गल्लीच्या राजाचे व्हिडिओ गीत नुकतेच प्रदर्शित करण्यात आले. खडक गल्लीच्या अधिकृत यु-ट्यूब पेजवर हे गीत प्रदर्शित करण्यात आले आहे. गाण्याच्या शूटिंगसाठी मुंबई येथील दिग्दर्शक-अभिनेता विकास पाटील बेळगावला आले होते. अल्पावधीतच या गीताने रसिकांना भुरळ घातली आहे.
मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचे गायक हर्षवर्धन वावरे यांनी हे गीत गायिले आहे. केवल वाळंज यांनी हे गीत मिक्समास्टर केले. बेळगावमधील अनुप पवार यांनी खडक गल्लीच्या राजाचे गीत रचले आहे. ऋषिकेश शिनोळकर यांनी या गाण्याला संगीत दिले.
गीत प्रदर्शनावेळी खडक गल्ली येथील गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी तसेच इन्फिनिटी ग्रुपच्या सदस्यांनी भाग घेतला होता. साहाय्यक दिग्दर्शक म्हणून शिवानी बस्तवाडकर व निशांत भोईटे यांनी काम पाहिले. मंडळाला यावर्षी 75 वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त भव्यदिव्य आगमन सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळीही भाविकांच्या उपस्थितीत या गाण्याचे शूटिंग झाले. सध्या हे गाणे मराठी टीव्ही चॅनेल्सवर दाखविले जात आहे.