स्वप्नवत हंगामात जोस बटलरचे दुसरे झुंजार शतक, 5 फलंदाज गारद करणाऱया चहलचे एकाच षटकात हॅट्ट्रिकसह 4 बळी
वृत्तसंस्था/ मुंबई
जोस बटलरचे (61 चेंडूत 103) हंगामातील दुसरे झंझावाती शतक आणि सामनावीर यजुवेंद्र चहलच्या (4 षटकात 5-40) धमाकेदार हॅट्ट्रिकच्या बळावर राजस्थान रॉयल्सने शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या आयपीएल साखळी सामन्यात केकेआरवर अवघ्या 7 धावांनी रोमांचक विजय प्राप्त केला. बटलरच्या झंझावातामुळे राजस्थानने 5 बाद 217 धावांचा डोंगर रचल्यानंतर केकेआरने जोरदार संघर्ष साकारला. मात्र, 19.4 षटकात 210 धावांमध्ये डाव आटोपल्याने त्यांना निसटता पराभव पत्करावा लागला. उमेश यादवची 9 चेंडूतील 21 धावांची झुंजार खेळी संपुष्टात आल्यानंतर राजस्थानच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले.
विजयासाठी 218 धावांचे आव्हान असताना केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यरने 51 चेंडूत 85 धावांची आतषबाजी केली. याशिवाय, सलामीवीर ऍरॉन फिंचने 28 चेंडूत 58 धावा झोडपल्या. उमेश यादवने शेवटच्या टप्प्यात जोरदार फटकेबाजी करत खळबळ उडवून दिली. पण, अंतिमतः मकॉयच्या स्लोअर वनवर त्रिफळाचीत झाल्यानंतर त्याचा संघर्ष संपुष्टात आला.
बटलरचे हंगामात दुसरे शतक
यंदा ड्रीम सीझनची अनुभूती घेत असलेल्या बटलरने केकेआरच्या दुबळय़ा गोलंदाजी लाईनअपची पूर्ण चिरफाड करत हंगामातील दुसरे शतक साजरे केले आणि या बळावर राजस्थानने 5 बाद 217 धावांचा डोंगर रचला. बटलरने उमेश यादवला (4 षटकात 0-44) खेचलेला षटकार तर निव्वळ लक्षवेधी ठरला.
नंतर पॅट कमिन्सचा एक चेंडू हूक करण्याच्या प्रयत्नात बटलर बाद झाला, त्यावेळी राजस्थानने एव्हाना 180 धावांचा टप्पा सर केला होता. बटलरने देवदत्त पडिक्कलसमवेत 97 धावांची सलामी दिली. मात्र, यात बटलरच अधिक स्ट्राईकवर राहिला. पहिल्या 10 षटकात पडिक्कलने (18 चेंडूत 24) केवळ 18 चेंडूंचा सामना केला. नंतर बटलरच्या साथीला आलेल्या कर्णधार संजू सॅमसनने 19 चेंडूत जलद 38 धावा फटकावल्या. बटलर-सॅमसन जोडीने 5.4 षटकातच 67 धावांची आतषबाजी केली.
केकेआरतर्फे सुनील नरेनचा (4 षटकात 2-21) अपवाद वगळता अन्य एकही गोलंदाज बटलरला पेचात आणू शकला नाही. बटलरने 6 सामन्यात 375 धावांची आतषबाजी केली असून ऑरेंज कॅपच्या तालिकेत सध्या तोच आघाडीवर आहे. वरुण चक्रवर्तीसाठी यंदाचा प्रवास ‘बॅड टू वर्स’ ठरत चालला असून येथे त्याला 2 षटकात 30 धावा मोजाव्या लागल्या.
चक्रवर्तीच्या कोटय़ातील उर्वरित 2 षटके पूर्ण करण्यासाठी केकेआरने रसेलला पाचारण केले. पण, रसेलच्या 2 षटकातही 29 धावा चोपल्या गेल्या आणि अशा रितीने या 4 षटकात एकूण 59 धावांची लयलूट झाली.
अन् उमेश यादवची ‘ती’ झुंज शेवटच्या षटकात निष्फळ ठरली!
दहाव्या स्थानी फलंदाजीला उतरलेल्या उमेश यादवने या लढतीत अवघ्या 9 चेंडूत 21 धावांची आतषबाजी करत राजस्थान रॉयल्सची सर्व नशा उतरवण्याची जवळपास पूर्ण तयारी केली होती. मात्र, डावखुऱया मकॉयने शेवटच्या षटकातील चौथा चेंडू गुडलेंग्थवर टाकत उमेश यादवचा त्रिफळा उडवला आणि इथेच केकेआरच्या संघर्षाची पराभवाने सांगता झाली.
चहलचे एकाच षटकात 4 बळी आणि सामन्याला कलाटणी!
राजस्थानतर्फे यजुवेंद्र चहल 4 षटकात 40 धावा दिल्याने महागडा ठरला असला तरी त्याने एकाच षटकात हॅट्ट्रिकसह घेतलेले 4 बळी सामन्याला कलाटणी देणारे ठरले. केकेआरला शेवटच्या 4 षटकात 40 धावांची आवश्यकता असताना चहलने 17 व्या षटकातील पहिल्या चेंडूवर वेंकटेश अय्यरला (6) यष्टीरक्षक सॅमसनकरवी यष्टीचीत करत पहिले यश मिळवून दिले आणि त्यानंतर चौथ्या चेंडूवर श्रेयस अय्यर, पाचव्या चेंडूवर शिवम मावी आणि शेवटच्या चेंडूवर पॅट कमिन्सला बाद करत हॅट्ट्रिक नोंदवली. यापैकी, अय्यर पायचीत झाला, शिवम मावीने लाँगऑनवर परागकडे झेल दिला तर कमिन्सला सॅमसनने यष्टीमागे झेलबाद केले!
संक्षिप्त धावफलक
राजस्थान रॉयल्स ः 20 षटकात 5 बाद 217 (जोस बटलर 61 चेंडूत 9 चौकार, 5 षटकारांसह 103, संजू सॅमसन 19 चेंडूत 3 चौकार, 2 षटकारांसह 38, पडिक्कल 18 चेंडूत 24, शिमरॉन हेतमेयर 13 चेंडूत 2 चौकार, 2 षटकारांसह नाबाद 26, रविचंद्रन अश्विन नाबाद 2. सुनील नरेन 2-21, मावी, कमिन्स, रसेल प्रत्येकी 1 बळी).
केकेआर ः 19.4 षटकात सर्वबाद 210 (श्रेयस अय्यर 51 चेंडूत 7 चौकार, 4 षटकारांसह 85, ऍरॉन फिंच 28 चेंडूत 9 चौकार, 2 षटकारांसह 58, उमेश यादव 9 चेंडूत 1 चौकार, 2 षटकारांसह 21. अवांतर 13. यजुवेंद्र चहल 4 षटकात 5-40, ओबेड मकॉय 2-41, प्रसिद्ध कृष्णा, अश्विन प्रत्येकी 1 बळी)