सरवडे प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ (गोकुळ)च्या स्वीकृत संचालकपदी येथील माजी पंचायत समिती सदस्य राजेंद्र कृष्णाजी मोरे यांची निवड करण्यात आली.आज झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत निवडीचा ठराव करण्यात आला. मोरे हे सतेज पाटील गटाचे असून संचालक विजयसिंह मोरे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर त्यांचे बंधु राजेंद्र यांची निवड करण्यात आली आहे.
गोकुळमध्ये स्वीकृत संचालकाच्या दोन जागाा आहेत. सत्तांतर झाल्यानंतर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने एक एक जागा घेतली. आमदार पाटील यांनी बिद्रीचे माजी उपाध्यक्ष विजयसिंह मोरे यांना संधी दिली परंतु त्यांचे अकाली निधन झाल्यामुळे ही जागा रिक्त झाली होती. या जागेवर मोरे कुटुंबातीलच व्यक्ती घेण्याचा निर्णय सतेज पाटील यांनी घेतला होता. त्यानुसार त्यांचे बंधू राजेंद्र यांची निवड करण्यात आली आहे.
राजेंद्र मोरे यांनी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष, ग्रामपंचायतीचे सदस्य, पंचायत समिती सदस्य अशा पदावर काम केले आहे. युवकांमध्ये संघटन करुन कॉंग्रेस पक्षाच्या वाढीसाठी त्यांनी काम केले आहे. सहकारी संस्था स्थापण्यात त्यांनी पुढाकार ठेवला आहे. विजयसिंह मोरे यांच्या निधनामुळे मोरे गटाची जबाबदारी त्यांच्यावर आली आहे. या निवडीने मोरे गटाला बळकटी मिळाली आहे.
मोरे यांच्या निवडीचे वृत समजताच नेते, कार्यकर्ते यांनी भेटून शुभेच्छा दिल्या. दिवसभर विविध क्षेत्रातील लोकांनी त्यांचा सत्कार केला. मात्र विजयसिंह मोरे यांच्या निधनामुळे निवडीचा आनंदोत्सव साजरा केला नाही. साधेपणाने सत्कार झाले.निवड झाल्यानंतर मोरे म्हणाले,आमचे नेते सतेज पाटील व अन्य नेते मंडळींनी गोकुळच्या संचालक पदाची संधी दिली त्याला पात्र राहून दूध उत्पादकांच्या हितासाठी कार्यरत राहिन.