माजी नगराध्यक्षा रंजना रावत ; 31 जानेवारीला ग्रुप डान्स स्पर्धा
प्रतिनिधी/ सातारा
समाजातील तळागाळातील लोकांसाठी कार्य करण्यासाठी समाजपयोगी उपक्रम राबवण्यासाठी राजमाता श्री. छ. कल्पनाराजे भोसले यांच्या आर्शिवादाने आणि खासदार उदयनराजे यांच्या सहकार्याने स्थापन झालेले मैत्री फाउंडेशन आता राजमाता फाउंडेशन झाले आहे. कोरोनामुळे थांबलेले उपक्रम पुन्हा एकदा राजमाता फाउंडेशन या नावाने सुरु करण्यात येणार आहे. त्याबाबतचे नोंदणी प्रमाणपत्र सहाय्यक धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून प्रदान करण्यात आले आहे. नव्या जोमाने कार्यरत झालेल्या राजमाता फाउंडेशनची सुरुवात 31 जानेवारीला साताऱयात होणाऱया भव्य ग्रुप डान्स स्पर्धेतून होणार आहे, अशी माहिती राजमाता फौंडेशनच्या अध्यक्षा तथा माजी नगराध्यक्षा रंजना रावत यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
पत्रकात, यापूर्वी मैत्री फाउंडेशन या नावाने कार्यरत असलेल्या फाउंडेशनचे नाव आता राजमाता फाउंडेशन झाले आहे. जाणीव सामाजिक बांधिलकीची हे ब्रीदवाक्य असणाऱया फाउंडेशनच्या अध्यक्षपदी रंजना रावत यांची निवड झाली आहे. उपाध्यक्षपदी वंदना पवार, खजिनदारपदी वैशाली नायकवडी, सचिवपदी वैशाली फडणीस यांची निवड झाली आहे. सदस्य म्हणून सुवर्णा झिरपे, अरुणा नागरे, नीता राजपाल, शीला खंडेलवाल, सीमा गायकवाड, हेमलता जगताप, निशा गुजर यांचा समावेश आहे. राजमाता कल्पनाराजे भोसले यांचे आशीर्वाद आणि खा. श्री.छ. उदयनराजे भोसले यांचे सर्वतोपरी सहकार्यामुळे फाउंडेशनचे कार्य चांगल्या पध्दतीने सुरु आहे. साताऱयात 31 जानेवारीला शाहू कलामंदिरमध्ये सायंकाळी 4 वाजता भव्य ग्रुप डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रुप डान्समध्ये कमीत कमी 5 जणांची आवश्यकता असून यामध्ये महिला, मुले, मुली सहभागी होऊ शकतात. सर्व वयोगटातील स्पर्धकांसाठी स्पर्धा खुली असून एकूण पाच बक्षिसे दिली जाणार आहेत. त्यात प्रथम, व्दितीय, तृतीय क्रमांक आणि दोन उत्तेजनार्थ बक्षीसे दिली जाणार आहेत. विजेत्यांना रोख रक्कमेचे बक्षिस देण्यात येणार आहे. यासाठी प्रवेश शुल्क 500 रुपये असून 26 जानेवारीपर्यंत नाव नोंदणी करण्याचे आवाहनही राजमाता फौंडेशनच्या अध्यक्षा रंजना रावत यांनी केले आहे.
याबाबत बोलताना रंजना रावत म्हणाल्या, राजमाता कल्पानराजे भोसले आणि खा. श्री. छ. उदनयराजे भोसले यांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील महिलेला सातारचे नगराध्यक्ष होण्याची संधी दिली. त्यानंतर त्यांचा आदर्श ठेवत माझी वाटचाल सुरु आहे. त्यांच्याप्रमाणे समाजासाठी आपण काहीतरी करायला हवे या भावनेतून मैत्री फाउंडेशनची स्थापना केली. फाउंडेशनतर्फे दरवर्षी रंगपंचमी तसेच जिल्हा परिषदेच्या मैदानावर मोठय़ा प्रमाणात भव्य दांडियाचे आयोजन केले जाते. भजनी मंडळाच्या स्पर्धा घेतल्या. महिलांसाठी सखी माझी लावणी हा मधु कांबीकरांचा कार्यक्रम घेतला. हळदी कुंकू समारंभ, जागतिक महिला दिन असे विविध दिनही साजरे केले. महारांगोळी, महाभोंडला असे कार्यक्रम घेतले. लक्ष्मी टेकडी येथे आरोग्य शिबिरही घेतले होते. दोन वर्षाच्या कोरोनाच्या कालावधीत उपक्रमांमध्ये खंड पडला होता परंतु आता राजमाता फौंडेशनच्या माध्यमातून पुन्हा एकदा विविध उपक्रम आणि समाजोपयोगी कार्यक्रम राबवण्यात येणार असून त्याची सुरुवात 31 जानेवारीच्या भव्य ग्रुप डान्स स्पर्धेच्या माध्यमातून होणार असल्याची माहितीही राजमाता फाउंडेशनच्या अध्यक्ष रंजना रावत यांनी दिली. स्पर्धेत नाव नोंदणीसाठी वंदना पवार 8668237687, वैशाली फडणीस 7350434050 यांच्याशी संपर्क साधावा.