वृत्तसंस्था/ चंदीगड
हरियाणात सूर्यफूलाची खरेदी किमान आधारभूत दरानुसार (एमएसपी) करण्याच्या मागणीवरून गोंधळ निर्माण झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्य महामार्गांवर शेतकरी आंदोलन करत असून किसान संघटनेचे नेते राकेश टिकैत यांनीही त्यांना पाठिंबा दर्शवला आहे. शेतकऱ्यांना समर्थन देण्यासाठी बुधवारी ते कुऊक्षेत्रातील शाहाबादमध्ये पोहोचले होते.
गेल्या दोन दिवसांपासून राज्यात शेतकरी विविध मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत. आंदोलनादरम्यान मंगळवारी रोहतकमध्ये शेतकऱ्यांवर लाठीमार झाला होता. तसेच कर्नाल येथे महामार्ग रोखण्यासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. दिल्ली-चंदीगड महामार्ग रोखल्याबद्दल गुरनाम चधुनी आणि इतर शेतकरी नेत्यांना ताब्यात घेतल्याबाबत टिकैत यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच एमएसपीचा आग्रह धरणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीचार्ज होण्याची ही पहिलीच वेळ आहे. आता एमएसपीवर देशात मोठे आंदोलन होऊ शकते. कुऊक्षेत्र येथे होणाऱ्या बैठकीत आगामी रणनीती बनवून त्याची घोषणा केली जाईल, असे जाहीर करण्यात आले आहे.
अटकेच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी टोलनाक्यांवर आंदोलन सुरू केले आहे. हिसार, सिरसा, रोहतक, कर्नाल, अंबाला आणि कुरूक्षेत्रासह अनेक जिह्यांमध्ये शेतकऱ्यांनी टोलनाक्यांवर धरणे धरले आहे. ताब्यात घेतलेल्या शेतकऱ्यांना सोडले नाही तर संपूर्ण हरियाणात रास्तारोको करू, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला.