रक्षाबंधन आठवड्यावर : राख्या खरेदीची लगबग : सोने–चांदीच्या राख्या खरेदीकडे कल : गेल्यावर्षीच्या तुलनेत दरात वाढ
बेळगाव : भाऊ-बहिणीचे नाते दृढ करणारा रक्षाबंधनाचा सण अवघ्या आठ दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे बाजारात विविध प्रकारच्या आकर्षक राख्या दाखल झाल्या आहेत. विविध प्रकारच्या नवनवीन राख्यांनी बाजारपेठेतील दुकाने सजली आहेत. आपल्या भाऊरायाला चांगल्या प्रकारची राखी घेण्यासाठी बहिणींची गर्दी होऊ लागली आहे. बाजारपेठेत विविध प्रकारच्या आकर्षक राख्यांसह पारंपरिक गोंडा राखीही पाहावयास मिळत आहे. विशेषत: पांगुळ गल्ली, मेणसी गल्ली, गणपत गल्ली, खडेबाजार आदी ठिकाणी राख्यांनी दुकाने सजली आहेत. मात्र, गतवर्षीच्या तुलनेत यंदा राख्यांचे दर 20 टक्क्यांनी वाढले आहेत. त्यामुळे बहिणींना राख्यांसाठी जादा पैसे मोजावे लागत आहेत. साधारण 10 ते 200 रुपयांपर्यंत राख्यांच्या किमती आहेत. शिवाय नवीन राख्यांची क्रेझ निर्माण झाली आहे. याला तरुणींकडून पसंती मिळू लागली आहे.
बाजारात पारंपरिक राख्यांबरोबर डोरेमन, छोटा भीम आणि लाईटिंगच्या राख्याही दिसून येत आहेत. त्याबरोबरच रेशीम धागे, मोती, रुद्राक्ष, खडे अशा सुंदर आणि आकर्षक राख्या विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. महिला व तरुणींकडून आगाऊ राख्या खरेदी केल्या जात आहेत. विशेषत: परगावी राखी पाठविणाऱ्या बहिणींकडून राख्यांची खरेदी होऊ लागली आहे. सोन्या-चांदीच्या राख्या खरेदीकडेही कल वाढला आहे. आकर्षक राख्या तयार करण्यासाठी ऑर्डर दिली जात आहे. त्यामुळे सराफी दुकानांतूनही महिलांची वर्दळ वाढू लागली आहे. त्यामुळे सोन्या-चांदीच्या राखीतून उलाढाल वाढत आहे. मागील आठ दिवसांपासून राख्या खरेदी केल्या जात आहेत. दोऱ्याचा दर वाढल्याने यंदा राख्यांच्या किमती वाढल्याचे विक्रेते सांगत आहेत. गोंडा राखी 5 ते 20 रुपये, कार्टुन राखी 10 ते 100 रुपये, साधे मणी राखी 5 ते 10 रुपये, यासह 36, 40, 60 रुपये डझन विक्री होणाऱ्या राख्याही उपलब्ध आहेत. महिलांकडून विविध डिझाईन आणि व्हरायटीच्या राख्या खरेदी केल्या जात आहेत.