गुजरात राजस्थान सीमेवरचा वाळवंटी प्रदेश.. रंगीबेरंगी कपड्यांचे थरावर थर अंगावर चढवलेल्या प्रसन्नवदना स्त्रिया राखीच्या सणाची लोकगीतं गात होत्या. एवढ्या कमी पावसाचा वाळवंटी भाग. खाण्यापिण्याचे फारसे पर्याय उपलब्ध नाहीत. काठेवाडसारखं धनधान्य दूधदुभतंही उपलब्ध नाही. एवढ्या अभावातही त्या छान नटल्या होत्या. लोकगीतं असल्याने अर्थातच पारंपरिक चालीवर होती.
राखियो जी म्हारे ठाकुरजी
म्हारो सन्मान नारी सन्मान
तन कर्यो राखी मन कर्यो दरपन
आबरू तिलक कर्यो जी
राखियो जी….
महाराष्ट्रापेक्षा उत्तर आणि पश्चिमेकडील गुजरात, राजस्थान वगैरे राज्यात राखीचा सण फार मोठा मानला जातो. अगदी भाऊबिजेपेक्षा मोठा. त्यामुळे तिकडे त्या काळात मेवामिठाई देणे-करणे, भेटवस्तू, बहिणींनी भावाकडे जाणे किंवा बहिणीकडे शगुन पोहचवणे हे रुढीप्रमाणे चालतं. चितौडगडाची राणी कर्मावती हिने हुमायूनला राखी पाठवली होती आणि त्याने तिची लाज आणि लढाई दोन्ही वाचवली होती. अगदी यम आणि यमुनेच्या रक्षासूत्र बांधण्याच्या कथेपासून राखीचा सण सुरू आहे. म्हणजेच हजारो वर्षांची परंपरा आहे ती. त्यामुळे संगीतात रक्षाबंधनाचा येणारा उल्लेख अगदी ओघानेच येतो. आणि रक्षाबंधनाच्या दिवशी सकाळी रेडिओ लावला की राखीच्या सणाची सुंदर गाणी ऐकू येतात. अगदी जुन्यापासून नव्यापर्यंत.
रंगबिरंगी राखी लेकर आई बहना
राखी बंधवाले मेरे वीर
म्हणत अल्लडपणे नाचत येणारी माला सिन्हा ‘अनपढ’ मध्ये निरागस दिसते. लतादीदींनी नेहमीप्रमाणेच हे गीत इतकं सुरेख गायलंय की बहिणीचं आर्जव आणि भावाचं प्रेम याविषयी काही वेगळं सांगत बसावंच लागणार नाही. राखी म्हणजे मनगटावरचं भूषण तसा तो स्वर म्हणजे त्या पिक्चरचं भूषण आहे. मरहूम रफीसाहेब हे खानदानी अदब आणि सौजन्य याचंही मूर्तिमंत उदाहरण होते. त्यांच्या स्वरात जेव्हा
राखी धागों का त्योहार
राखी धागों का त्योहार
बंधा हुआ इक इक धागों में
भाई बहन का प्यार
हे गीत कानावर पडतं तेव्हा सात्त्विक गीत आणि जोडीला छोट्या बहिणभावांचं दाखवलेलं निर्व्याज प्रेम हे एकमेकांत मिसळून जातं. जुन्या जुन्या किती सिनेमातली अशी सुंदर सुंदर गाणी आहेत जी खरं तर प्रसिद्ध नाहीत फारशी. आता कुणाला आठवतही नसतील कदाचित. पण जेव्हा सहज कानावर पडतात तेव्हा लक्षात येतं की अरे, रक्षाबंधन आलं की जवळ! तसं तर आपण भारतीय लोक उत्सवप्रिय आहोतच. त्यामुळे उत्सव म्हटला की धामधूम, कौटुंबिक संमेलन हे असतंच. राखीच्या सणाला सगळे भाऊ आणि बहिणी एकत्र येतात तेव्हा प्रत्येकाच्या आवडीचं रक्षाबंधनाचं गाणं मनात रुंजी घालू लागलं तर नवल ते काय? 1959 सालातलं म्हणजे साठसत्तर वर्षांपूर्वीचं
भैया मेरे राखी के बंधन को निभाना
भैया मेरे छोटी बहना को ना भुलाना
हे लतादीदींनीच गायलेलं.(त्या काळात हिंदी सिनेमात प्लेबॅक म्हणजे गाये लता आणि गाये लता असंच होतं म्हणा!) आजही तितक्याच नव्या उत्साहाने लावलं जातं. नंदा आणि बलराज साहनी यांच्यावर हे गीत चित्रित करण्यात आलं होतं. बलराजजी म्हणजे साक्षात रुबाबदार! बहिणीच्या त्या आर्जवी विनंतीला ते इतक्या कौतुकाने स्वीकारताना दिसतात! पाहूनच डोळे निवतील. तशीच मीनाकुमारी ही श्रेष्ठतम कलाकार मानली जाते. आणि जेव्हा साहिर लुधियानवीसारख्या शब्दसम्राटाच्या लेखणीतून गीत उतरलं असेल, आणि आशाताई नामक ग्रेट गायिकेने ते गायलं असेल तर त्याची सुरेलता आणि सौंदर्य काय वर्णावं!
तेरे चेहरे की महकती हुई लडियों के
अनगिनत फूल उम्मीदों के चुने हैं मैंने
वो भी दिन आएं कि उन ख्वाबों के ताबीर मिलें
तेरे खातीर जो हसीं ख्वाब बुने हैं मैंने
मेरे भैया मेरे चंदा
मेरे अनमोल रतन
तेरे बदले मैं जमाने की कोई चीज न लूं
किती यथार्थ वर्णन आहे! आणि शब्दांची निवड कमाल आहे. प्रत्यक्ष ऐकावं आणि कान तृप्त करून घ्यावेत. अशी असंख्य गाणी आहेत ज्यांचे स्वर तर अमापच आनंद देतात पण शब्दही तितकेच वेधक, वेचक आहेत.
बहना ने भाई की कलाई से
बहना ने भाई की कलाई से प्यार बांधा है
प्यार के दो तार से, संसार बांधा है
रेशम की डोरी से…
रेशम की डोरी से संसार बांधा है
हे गायलंय सुमन कल्याणपूर यांनी. आपल्या सर्वांच्या लाडक्या धरमपाजींवर चित्रित झालेलं हे गाणं त्यावेळी खूप गाजलं होतं. यासारखी गाणी तर डोळ्यात पाणी आणतात आणि नकळत आपण देवाला हात जोडून विनंती करतो की जगात कोणत्याही भावाला बहिणीशिवाय आणि बहिणीला भावाशिवाय तडफडायची वेळ आणू नकोस. तर तिरंगा मधलं ‘इसे समझो ना रेशम का तार भैया’ किंवा अगदी प्रीती झिंटा चं ‘क्या कहना’ मधलं ‘प्यारा भैया मेरा’ हीही अशाच गाण्याची उदाहरणं! राखीपौर्णिमेच्या सणाचं जितकं कौतुक उत्तर पश्चिम भारतीयांना, तितकंच कौतुक महाराष्ट्रात असतं ते म्हणजे नारळीपौर्णिमा म्हणून असतं. कारण राखीची परंपरा खरं तर उत्तर भारतीयच. महाराष्ट्रासारख्या किनारपट्टी असणाऱ्या भागात समुद्राची पूजा करून, त्याला नारळ अर्पण करून त्या वर्षीची मासेमारी समारंभपूर्वक सुरू करायची याचाच मोठा उत्सव असतो. म्हणूनच
सन आयलाय गो आयलाय गो
नारलीपुनवेचा.
मनी आनंद माईना कोल्यांच्या दुनयेचा
म्हणत म्हणत कोळी बांधव उत्सव साजरा करतात. त्यामुळे आपल्याकडे रक्षाबंधनपेक्षा नारळीपौर्णिमेची गाणी अर्थात जास्त प्रसिद्ध आहेत. पौर्णिमा तीच असते. राखी बांधून बहिणभावांतला प्रेमाचा धागा घट्ट करणारी आणि दर्याला नारळ अर्पण करून कोळ्यांच्या उदरनिर्वाहाची काळजी घेणारी! आणि एक गोष्ट! आपण सगळे चंद्राला मामा म्हणतो म्हणजे आपली पृथ्वी ही त्याची बहीणच झाली! यंदा तिनेही धूमधडाक्यात त्याला चांद्रयानाच्या स्वरूपात राखी पाठवली आहे. त्यामुळे यंदाची राखी खासच!
– अॅड. अपर्णा परांजपे-प्रभु