वेस्टेवेअरच्या दरवाजातून मार्कंडेय नदीत पाणी सोडण्यासाठी नियोजनाची गरज : एकाचवेळी जादा पाणी सोडल्यास पूरस्थिती निर्माण होणार
वार्ताहर / तुडये
बेळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राकसकोप जलाशयाची पाणीपातळी 2475 फुटापर्यंत पोहचली आहे, 2475 फुटावरील पाणीपातळी वाढविल्यास जलाशय काठावरील पिकांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे पाणीपातळी स्थिर ठेवण्यासाठी वेस्टेवेअरच्या दरवाजातून मार्कंडेय नदीत पाणी सोडण्यामधील सुरळीत नियोजनाची गरज आहे. मार्कंडेय नदीत एकाचवेळी जादा पाणी सोडल्यास पूरस्थिती निर्माण होणार आहे.
सन 2019-2020 व 2021 या सलग तीन वर्षात पूरपरिस्थिती निर्माण करण्यास राकसकोप जलाशयाची वाढीव पाणीपातळी कारणीभूत ठरली होती. त्यावेळी जिल्हा पूर नियंत्रण विभागानेही दुर्लक्ष केल्याने या तिन्ही वर्षी मार्कंडेय नदीला येऊन मिळणारे सर्वच नाले पूरमय बनले. तुडये-सरोळी, तुडये-राकसकोप, तुडये-शिनोळी, सुरूते-यळेबैल, सुरूते-शिनोळी, सोनोली-बेळगुंदी, बेळगाव-मण्णूर, सुळगा-हिंडलगा, बेनकनहट्टी-बेळगाव या मार्गातील नाल्यावरील पुलावरून पाणी वाहत असल्याने हे मार्ग बंद झाले होते. सन 1962 साली उभारणी करण्यात आलेल्या राकसकोप जलाशयाची सुरूवातीची पाणीपातळी ही समुद्रसपाटीपासून 2470 फूट इतकी होती. 22 वर्षातील बेळगाव शहरातील पाण्याच्या वाढत्या मागणीसाठी मार्कंडेय नदी पात्रात वेस्टवेअरचे सहा दरवाजे उभारत पाणीपातळी 2475 फुटापर्यंत वाढवली. यामुळे पाणीसाठा कमालीचा वाढला. शहराला पाणीपुरवठा दररोज मुबलक प्रमाणात करण्यात आला. दरम्यान एका राकसकोप जलाशयावर अवलंबून राहण्यापेक्षा शहराला दुसऱ्या एका पाणीपुरवठा योजनेची आवश्यकता होती म्हणून हिडकल येथून पाणीपुरवठा योजना अंमलात आली.
बेळगाव शहरासह उपनगरांची संख्या जादा झाल्याने पाण्याच्या मागणीतही वाढ झाले. पाणी टंचाई दूर करण्यासाठी 2015 साली प्रथम वेस्टवेअरच्या सहाही दरवाजांवर सिमेंटच्या रिकामी पोत्यामध्ये माती भरून ती पोती ठेवत पाणीपातळीत फूटभर वाढ करण्यात आली. विस्तारलेल्या पाणी पातळीमुळे शहराला किमान आठवडाभर पुरेल इतके पाणी वाढविण्यात पाणीपुरवठा मंडळ यशस्वी ठरले. 2017 साली या दरवाजांवरील पोत्यातून होणारी गळती रोखण्यासाठी एक फुटाचे पत्रे वेल्डींगद्वारे बसवत पाणीपातळी 2476 फुटावर करण्यात आली. त्यानंतर मात्र या पत्र्यांना फूट-फूट करत पाणीपातळी 2479 फुटापर्यंत करण्यात आली.
2019 साली मार्कंडेय नदीवरील सर्व पूल गेले होते पाण्याखाली
2018 पर्यंत पाण्याचा साठा हा योग्य पध्दतीचा असल्याने पुराचे संकट आधी जाणवले नाही. मात्र 2019 साली पाणीपातळी ही 2479 फूट झाल्यानंतर मुसळधार पाऊस झाल्याने जलाशयाला येणाऱ्या पाण्याचा ओघ जादा झाल्याने जलाशयाचा असलेला मातीचा बंधारा वाहून जातो की काय? अशी परिस्थिती निर्माण झाल्याने वेस्टवेअरचे सहाही दरवाजे सात फुटाने उघडण्यात आल्याने मार्कंडेय नदीला मोठा पूर आला होता. या नदीवरील सर्व पूल पाण्याखाली गेले होती.
पत्र्यांची उंची कमी करण्यास उदासीनता
जलाशय काठावरील पश्चिमेकडील सर्व क्षेत्र हे महाराष्ट्र राज्याच्या हद्दीत आहे. 2475 फूट पाणीपातळीपर्यंतची जमीन ही 1960 साली कर्नाटक राज्याने संपादित केली. 2480 फूटपर्यंत पाणीपातळी झाल्यास तुड्यो-मळवी येथील शेतकऱ्यांच्या उभ्या पिकात पाणी शिरते आणि पिके पाण्याखाली बुडाल्याने मोठ्या प्रमाणातील पिकांचे नुकसान होते. 2019-2020 व 2021 साली झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी आक्रमक बनल्याने कर्नाटक व महाराष्ट्र राज्यांच्या पाटबंधारे विभागाची एक बैठक मुंबईत मंत्रालयात झाली. कर्नाटकाचे दोन्ही राज्यांचे पाटबंधारे मंत्री, चंदगडचे आमदार राजेश पाटील, दोन्ही राज्यांचे सचिव यांच्यात चर्चा घडली आणि शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी पाणीपातळी ही 2475 फुटावरच ठेवण्याचे ठरले. त्यानुसार मागील वर्षी पाणीपातळी ही 2475 फुटावरच नियंत्रित ठेवण्यात आली होती. त्यामुळेच यावर्षी शहराला पाणी टंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागले आहे. पाणीपातळी ही 2475 फुटावर राहिली तरीही पत्रे मात्र 2479 फुटापर्यंत असल्याने पुढील पातळीत सातत्याने वाढ होणार आहे. ती कमी करण्यासाठी एकाचवेळी दरवाजे उघडल्यास पूरमय परिस्थिती नक्कीच निर्माण होणार आहे. त्याकरिता या पत्र्यावरील वेल्डींगचे बसविण्यात आलेले पाच फुटाचे पत्रे काढून टाकण्याची गरज निर्माण झाली आहे. गुऊवारी सकाळी पाणीपातळी 2475 फूट झाल्याने जलाशयाने आपली पाणीपातळी पूर्ण केली आहे. या परिसरात पावसाचा जोर कायम राहिल्याने दोन दरवाजे 8 इंचाने उचलण्यात आले आहेत. परिणामी मार्कंडेय नदीला पाणी वाढले आहे.
नुकसान भरपाईचा दावा प्रलंबित
तुडये येथील शेतकऱ्यांच्या उभ्या पिकात जलाशयाचे पाणी साचल्याने झालेल्या पिकांच्या नुकसानीची भरपाई मागणी करणारा दावा दिल्लीतील न्यायालयात प्रलंबित आहे.