ते आल्यास त्यांचे स्वागतच
वृत्तसंस्था/ पाटणा
केंद्रीय मंत्री पशुपति कुमार पारस यांनी मंगळवारी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासंबंधी वक्तव्य केले आहे. रालोआत नितीश कुमार हे पुन्हा येणार असल्याची चर्चा आहे. व्यक्ती बलवान नसतो, काळ बलवान असतो. वेळेची प्रतीक्षा करा. पुढे जे काही घडेल ते चांगलेच असणार आहे. नितीश कुमार रालोआत आल्यास आम्ही त्यांचे स्वागतच करू असे पारस यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले आहे.
मागील काही काळापासून नितीश कुमार हे पुन्हा रालोआच्या वाटेवर असल्याची चर्चा जोर पकडू लागली आहे. नितुश कुमार यांनी भाजप नेतृत्वाशी पुन्हा जवळीक साधल्याचे मानले जात असून यासंबंधी भाजप नेत्यांकडून अनेक विधाने करण्यात आली आहेत. विरोधी पक्षांच्या आघाडीचे संयोजकपद न मिळाल्याने नितीश कुमार यांनी पुन्हा रालोआत जाण्याचा विचार चालविला असल्याचे मानले जात आहे. नितीश कुमार यांनी स्वत: हे दावे फेटाळले असले तरीही त्यांचा राजकीय इतिहास पाहता आता राजद देखील अत्यंत सतर्क झाला आहे.