डिसेंबर किंवा जानेवारीत होणार सोहळा : देशभरात 7 दिवस उत्सव चालणार
वृत्तसंस्था /अयोध्या
अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या श्रीराम मंदिरात रामलल्लाची मूर्ती डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये स्थापित होणार आहे. श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट प्राणप्रतिष्ठा सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पार पाडणार आहे. या सोहळ्याची तारीख अद्याप निश्चित करण्यात आलेली नाही, परंतु याकरता तज्ञमंडळींशी चर्चा केली जात असल्याची माहिती ट्रस्टच्या बैठकीनंतर महासचिव चंपत राय यांनी दिली आहे. राम मंदिराचा तळमजला तसेच गर्भगृहाचे काम 15 डिसेंबरपर्यंत पूर्ण केले जाणार आहे. यानंतर प्राणप्रतिष्ठेची तयारी होईल. पंतप्रधान मोदींना डिसेंबर ते 26 जानेवारी 2024 दरम्यान सोहळ्याच्या संभाव्य तारखेविषयी सांगण्यात येणार असल्याचे राय यांनी सांगितले आहे. ट्रस्टचे खजिनदार गोविंद देव गिरि आमंत्रणासाठी पत्र तयार करतील. यावर महंत नृत्यगोपाल दास यांची स्वाक्षरी असणार आहे. हे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठविण्यात येणार आहे. तळमजल्याचे 85 टक्के काम पूर्ण झाले आहे. देशभरात रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेचा उत्सव 7 दिवसांपर्यंत साजरा केला जाणार आहे. देशभरात 7 दिवसांच्या उत्सवासाठी संत-धर्माचार्यांना आवाहन करण्यात येणार असल्याचे चंपत राय यांनी म्हटले आहे.
3 मूर्ती निर्मितीचे कार्य सुरू
अयोध्येत श्रीराम मंदिरासाठी रामलल्लाच्या 3 मूर्तींचे निर्मितीकार्य सुरू झाले आहे. शिरावर मुकुट, हातात धनुष्यबाण धारण केलेल्या रामलल्लाची मूर्ती तयार केली जात असून याकरता कर्नाटकातील 2 श्याम शिला आणि राजस्थानच्या श्वेत संगमरमरचा वापर होत आहे. यापैकी कुठल्या मूर्तीची गर्भगृहासाठी निवड केली जाईल हे अद्याप निश्चित नाही. या मूर्ती पूर्णपणे तयार करण्यास सुमारे 4 महिन्यांचा कालावधी लागणार आहे. रामसेवकपुरममध्ये कर्नाटकातून आणल्या गेलेल्या दोन शिलांना आकार दिला जात आहे. कर्नाटकातील शिल्पकार गणेश एल. भट्ट आणि राजस्थानचे शिल्पकार सत्यनारायण पांडे यांच्या नेतृत्वात हे काम होत आहे.
आज होणार महत्त्वाची घोषणा
2 जून रोजी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्यगोपाल दास यांचा जन्मोत्सव आहे. या दिवशी संत संमेलनात राम मंदिर ट्रस्ट अन् देशभरातील संत सामील होणार आहेत. ट्रस्टच्या बैठकीत रामलल्लाच्या मूर्तीवर सहमती झाल्यावर संत संमेलनात याची घोषणा केली जाणार असल्याचे मानले जात आहे.