मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची तटस्थ भूमिका
पणजी : संपूर्ण देशभरात रामनवमी उत्सवाची सुटी जाहीर असल्याने गोव्यातही रामनवमीदिवशी सरकारी पातळीवर सुटी जाहीर करावी, अशी मागणी गोवा फॉरवर्ड पक्षाचे प्रमुख तथा फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी केली होती. परंतु मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी रामनवमीची सुटी सरकारी पातळीवर जाहीर करणार नसल्याची तटस्थ भूमिका घेतली आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले की, गोव्यात रामनवमी उत्सवाची सुटी ही मर्यादित स्वऊपाची (आरएच) अशी आहे. त्यामुळे ती सरकारी पातळीवर जाहीर करायलाच हवी, असे काही बंधन नाही. परंतु तरीही विरोधक या मुद्यावरून मुद्दामहून आवाज उठवत आहेत. त्यांच्याकडे जनतेच्या भल्याचे अन्य कुठलेच मुद्दे उपस्थित नसल्याने ते अशा गोष्टी पुढे रेटत आहेत. सरकारी पातळीवर रामनवमी उत्सवाची सुटी जाहीर करणे सध्यातरी शक्य नाही. कारण वर्षभरातील नियोजन अगोदरच ठरलेले असते आणि त्यानुसार सरकारी कॅलेंडर निघते. त्यामध्ये आता बदल होणे शक्य नसल्याने सरकारी पातळीवर रामनवमी सुटी जाहीर करता येत नसल्याचेही मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले.