वृत्तसंस्था/ मंगळूर
रविवारी येथे झालेल्या तिसऱया इंडियन खुल्या सर्फिंग स्पर्धेत कर्नाटकाच्या रमेश बुदिहाळने तामीळनाडूच्या अजीश अलीचा पराभव करत पुरूष विभागातील विजेतेपद पटकाविले. त्याचप्रमाणे महिलांच्या विभागात सुगर बनारसे तसेच मुलींच्या 16 वर्षांखालील वयोगटात सोफिया शर्माने विजेतेपद पटकाविले. तामीळनाडूच्या किशोरकुमारने मुलांच्या 16 वर्षांखालील वयोगटात राष्ट्रीय विजेतेपद मिळविले.
रविवारी या स्पर्धैच्या शेवटच्या दिवशी पुरूषांच्या खुल्या विभागातील उपांत्य फेरीला प्रारंभ झाला. कर्नाटकाचा रमेश बुदिहाळ, तामीळनाडूचा अजीश अली, सतीश सर्वानन आणि व्ही. रूबेन यांनी आपला सहभाग दर्शविला. त्यानंतर रमेश आणि अजीश अली यांनी अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. अंतिम फेरीत रमेशने 16.33 गुण घेत विजेतेपद तर अजीश अलीने 15.67 गुण घेत उपविजेतेपद, सतीशने 13 गुण नेंदवित तिसरे स्थान मिळविले.
महिलांच्या खुल्या विभागातील अंतिम लढतीत गोव्याच्या सुगर बनारसेने 14.50 गुणांसह विजेतेपद तर सृष्टीने 13.40 गुणांसह उपविजेतेपद, कर्नाटकाचा सिंचना गौडाने 10.20 गुणांसह तिसरे स्थान मिळविले. या राष्ट्रीय सर्फिंग स्पर्धेत तामीळनाडूने सर्वाधिक म्हणजे सहा पदके मिळविली असून कर्नाटकाने 5 तर गोवाने 2 पदके मिळविली.