पुणे / वार्ताहर :
कोरेगाव पार्क परिसरातील हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी आलेल्या एका व्यावसायिकाच्या कारवर अज्ञाताने दहा लाखांच्या खंडणीची मागणी करणारी चिठ्ठी चिकटवली. पैसे न दिल्यास कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी या चिठ्ठीमधून व्यावसायिकाला देण्यात आली आहे.
याप्रकरणी एका अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हडपसर येथील मगरपट्टासिटी येथे राहणाऱ्या एका 37 वर्षीय व्यावसायिकाने यासंदर्भात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे मूळचे बारामती येथील आहेत. ते हॉटेल व्यावसायिक तसेच जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय करतात. दि. 31 जुलै रोजी ते रात्री साडेआठच्या सुमारास त्यांचा मित्र पंकज निकुडे यांच्यासोबत कोरेगावपार्क येथील लेन नंबर 7 येथील डेझर्ट वॉटर हॉटेल येथे जेवण करण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी त्याची कार हॉटेलच्या बाहेरील बाजुला पार्क केली होती. हॉटेलमध्ये जेवण करून रात्री सव्वाबाराला बाहेर पडल्यानंतर गाडीजवळ गेल्यावर त्यांना त्यांच्या कारच्या दरवाजाला एक पांढरे बंद पाकीट चिकटविल्याचे दिसले. त्यानी ते बंद पाकीट उघडून पाहिले असता त्यामध्ये त्यांना एक हिंदी मजकुराची चिठ्ठी सापडली. त्यामध्ये त्यांनी मला दहा लाखांची गरज आहे. मला पैसे दिले नाही, पोलिसांना सांगितले तर तुझ्या कुटुंबातील एक एक व्यक्तीला मारून टाकेन, अशी धमकी देण्यात आली. तुम्हाला जर विश्वास नसेल तर परवापासून आम्ही तुमच्या मृत्यूची वाट पाहू. पैसे देताना आमचा एक जरी माणूस पकडला गेला तर आमची पन्नास लोक आहेत, त्यामुळे तुझ्या कुटुंबातील एकही माणूस जिवंत राहणार नाही, तुझ्या एका चुकीची शिक्षा ही मृत्यू आहे. त्यामुळे आम्ही दिलेल्या नंबरवर कॉल करा, पैसे दिल्यावर तु तुझ्या वाटेला आम्ही आमच्या वाटेला असा उल्लेख या चिठ्ठीत होता.
फिर्यादी यांनी संबंधित नंबरवर दोन ते तीन वेळा फोन केले. परंतु, समोरील व्यक्तीने त्यांचे फोन उचलले नाही. त्यानंतर ते घरी गेले. सकाळी दहा वाजता फिर्यादी जेजुरी येथे गेले. मित्र पंकज बरोबर असताना दुपारी अडीच वाजता पंकंज यांच्या मोबाईलवर फोन आला. त्यावेळी पैशाची मागणी करण्यात आली. तुझा व तुझ्या कुटुंबियाचा जीव वाचवायचा असेल तर तु कोरेगाव पार्क येथे जेवणाच्या डब्यात दहा लाख रूपये घेवुन ये. ते कोठे आणायचे कसे आणायचे ते मी सांगतो अशी धमकी दिली. दरम्यान या प्रकारानंतर तक्रारदारांनी कोरेगावपार्क पोलीस ठाण्यात धाव घेऊन याबाबत तक्रार दिली. पुढील तपास कोरेगाव पार्क पोलीस करत आहेत.