प्रतिनिधी / बेळगाव
पहिले रेल्वेगेट टिळकवाडी येथे गैरसोयीचे ठरत असलेले बॅरिकेड्स हटावसाठी शुक्रवारी दुपारी 4 वाजता रास्तारोको आंदोलन छेडण्यात येणार आहे. 2014 पासून सातत्याने येथील बॅरिकेड्स हटवावेत, यासाठी निवेदने देऊन आंदोलने छेडण्यात आली आहेत. लोकप्रतिनिधी, पोलीस प्रशासन, जिल्हाधिकारी, प्रादेशिक आयुक्त, मनपा, पालकमंत्री, मुख्यमंत्री, राज्यपाल व अतिरिक्त पोलीस महासंचालकांना निवेदने सादर करण्यात आली आहेत.
दरम्यान दिल्ली येथील मानव हक्क आयोगाकडून बॅरिकेड्स हटविण्याबाबत पत्र आले आहे. मात्र अद्याप बॅरिकेड्स हटविण्याकडे दुर्लक्ष झाले आहे. बॅरिकेड्सबाबत शुक्रवारी दुपारी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. टिळकवाडी परिसरातील नागरिक, व्यापारी, विद्यार्थी, भाजीविक्रेते, रिक्षाचालक, गवळी बांधव या सर्वांनी आंदोलनासाठी बहुसंख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते मनोहर शिरोडकर व सुभाष घोलप यांनी केले आहे.