नागरिकांच्या सुविधेसाठी प्रशासनाने तत्पर रहावे : पालकमंत्री उदय सामंत
रत्नागिरी प्रतिनिधी
एमआयडीसी प्रशासनाकडून नगर परिषदेस प्रतिदिन 5 दक्षलक्ष लीटर पाण्याचा पुरवठा केला जात आहे.सद्यस्थितीत प्राथमिक स्तरावरील पंपिंग यंत्रणा उभारण्याचे काम सुरू असून, रविवारपासून शहरातील जलवितरण पूर्ववत होणार आहे. दरम्यान, शहरवासियांना कमीत कमी त्रास होईल, त्यांच्या सुविधेसाठी प्रशासनाने सदैव तत्पर रहायला हवे, अशी सूचना पालकमंत्री उदय सामंत यांनी नगर परिषद प्रशासनाला दिली.
रत्नागिरी शहरातील पाणी पुरवठा योजनेसंदर्भात पालकमंत्री सामंत यांनी शुक्रवारी आढावा बैठक घेतली. या बैठकीला जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षीत यादव, प्रांताधिकारी जीवन देसाई, मुख्यधिकारी तुषार बाबर उपस्थित होते.
पालकमंत्री . सामंत यांनी नगर परिषद प्रशासनाने यावेळी सूचना केल्या. ते म्हणाले, नागरिकांना पाणी पुरवठा करणे हे अत्यंत महत्वाचे आहे. नगर परिषदेचा पाणीपुरवठा बंद झाल्याचे समजताच एमआयडीसीच्या माध्यमातून नागरिकांसाठी तात्काळ पाणी पुरवठ्याची सोय करण्यात आली आहे. नागरिकांना कमीत कमी त्रास होईल, हे प्रशासनाने पहावे. त्यांच्या सुविधेसाठी प्रशासनाने कायम तत्पर असायला हवे. त्यासाठी प्रशासनदेखील अहोरात्र काम करत असून निश्चितपणे रविवारपासून शहरातील पाणी पुरवठा सुरळीत होईल.
मुख्याधिकारी बाबर यांनी यावेळी सद्यस्थितीचा आढावा दिला. रत्नागिरी नगर परिषदेच्या शिळ जॅकवेल या मुख्य जलस्त्रोतावरून संपूर्ण शहरात पाणी पुरवठा केला जातो. नगरपरिषदेमार्फत शहरात प्रतिदिन 18 दक्षलक्ष लीटर पिण्यायोग्य पाणी वितरीत केले जाते. तथापि, गुरूवार 21 सप्टेंबर रोजी पहाटे 1 वाजता नैसर्गिक आपत्तीमुळे शिळ जॅकवेल अचानक ढासळले. परिणामी, जॅकवेलमधील पंपींग यंत्रणा देखील नादुरूस्त होवून खाली गेल्याने शिळ जॅकवेल या जलस्त्रोतावरून शहरात होणारा पाणी पुरवठा बंद झाला.
पालकमंत्री सामंत यांनी निर्माण झालेली आपत्कालीन परिस्थिती विचारात घेऊन पाण्याअभावी नागररिकांचे हाल होवू नये यासाठी त्यांनी एमआयडीसी प्रशासनाला नगर परिषदेस तातडीने पाणी पुरवठा करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार 22 सप्टेंबर रोजीपासून एमआयडीसीने नगर परिषदेस पाणी पुरवठा करण्यास सुरूवात केली आहे. एमआयडीसीकडून पाणी पुरवठा घेण्यासाठी नगर परिषदेने तातडीने एक दिवसात जलवाहिनी टाकण्याची कार्यवाही केली असून त्यामधून एमआयडीसी प्रशासनाकडून नगर परिषदेस प्रतिदिन 5 द.ल.ली. पाण्याचा पुरवठा केला जात आहे.
रत्नागिरी नगर परिषदेच्या पानवल धरणावरून येणारे अल्प पाणी व एमआयडीसीकडून मिळणारे पाणी यांच्या मदतीने शहरात पाणी पुरवठा सुरू आहे. तसेच आवश्यक त्या ठिकाणी टँकरद्वारे देखील पाणी पुरवठा करण्यात येत आहे. शिळ येथील नवीन संपवेल सुरू करण्याचे काम अहोरात्र युध्दपातळीवर सुरू आहे. या ठिकाणी दोन स्तरांवर पाण्याचे पंपींग करण्यात येणार असून, प्राथमिक स्तरावर 20 एचपी क्षमतेच्या 4 पाणीबुडे पंपाद्वारे प्रतितास 1200 घनमीटर पाणी उपसा करून ते संपवेलमध्ये सोडण्यात येणार आहे. तर दुसऱ्या स्तरावर 250 एचपी क्षमतेच्या 3 व्हर्टीकल टर्बाइल पंपाद्वारे हे पाणी साळवी स्टॉप येथील जलशुद्धीकरण केंद्रावर आणले जाणार आहे.
दुसऱ्या स्तरावरील पंपीग यंत्रणा बसविण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. या पंपिंग यंत्रणेच्या विद्युत जोडणीचे काम प्रगती पथावर आहे. उद्या सायंकाळी साळवी स्टॉप येथील जलशुद्धीकरण केंद्रात पाणी आणले जाणार असून, शुद्धीकरण करून ते शहरातील मुख्य साठवण टाक्यामध्ये साठवण केल्यावर रविवारपासून शहरातील जलवितरण पूर्ववत होणार आहे अशी माहिती पालकमंत्री सामंत यांनी दिली.