रत्नागिरीः प्रतिनिधी
शहरातील सुव्यवस्थेला धोका निर्माण करणाऱ्याची संख्या वाढत आहे. सामाजिक शांतता बिघडवणाऱ्या अशा ९ जणांविरोधातील हद्दपारीचे प्रस्ताव पोलीस प्रशासनाकडून रत्नागिरीचे प्रांताधिकारी यांच्याकडे सुनावणीसाठी पाठवण्यात आले आहेत. विशेष म्हणजे यात महिलेचाही समावेश आहे.
गेल्या काही महिन्यांपासून रत्नागिरी शहरातील काही भागात अनेक ठिकाणी अमली पदार्थांचे साठे सापडले आहेत. यापैकी काहींचे अंमली पदार्थ विक्रीत अनेक ठिकाणी लागेबांधे असण्याची शक्यताही पोलीस विभागाकडून वर्तवली जात आहे. याचा शोध लावण्यासाठी पोलिसांनी केलेल्या कारवाईत अनेकांना जेरबंदही करण्यात आले आहे. तर याविरोधात पोलिसांनी कारवाईची जोरदार मोहीम उघडली आहे.
यात अडकलेल्या काही जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. हे गंभीर गुन्हे लक्षात घेऊन तसेच सामाजिक शांततेला बाधा येऊ नये, या उद्देशाने पोलीस प्रशासनाने त्यांच्या हद्दपारीचे प्रस्ताव रत्नागिरीच्या उपविभागीय कार्यालयाकडे सुनावणीसाठी पाठवले आहेत.
रिहाना ऊर्फ रेहाना ऊर्फ रिजवाना गफार पकाली, ओंकार मोरे, हेमंत भास्कर पाटील, सरफराज ऊर्फ बॉक्सर अहमद शहा, स्वप्नील बाळू पाचकुडे, सलमान नाजीम पावसकर, फहीम अहमद नूरमहंमद खडकवाले, अमिर मुजावर, अमेय राजेंद्र मसूरकर यांचा समावेश आहे.
यापैकी काहीजण अंमली पदार्थ विक्रीत अडकलेले असून त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. यामुळे समाजस्वास्थ्याला बाधा निर्माण होण्याचा धोका लक्षात घेऊन अशांवर कठोर कारवाई होण्याच्या उद्देशाने पोलीस प्रशासनाने या ९ जणांच्या हद्दपारीचे आदेश पाठवले आहेत.