गायब पती-पत्नीस पुण्याहून घेतले ताब्यात, 2 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी
चिपळूण प्रतिनिधी
खेर्डी येथील धनरेषा अर्बन निधी लि. कंपनीमध्ये तब्बल 96 लाखांचा घोळ घालून गायब झालेल्या पती-पत्नीस सेमवारी चिपळूण पोलिसांनी पुण्यात ताब्यात घेत अटक केली. त्यांना 2 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून त्यांच्या चौकशीतून काही महत्वाची माहिती पोलिसांच्या हाती लागणार आहे.
राहुल अरविंद भगत (36), प्रियांका राहुल भगत (33) असे अटक केलेल्या पती-पत्नीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 2020पासून खेर्डी येथे धनरेषा अर्बन निधी लि. कंपनी कार्यरत होती. असे असताना यामध्ये आलेल्या ग्राहकवर्गाला आकर्षक दामदुप्पट ठेवीसह तसेच संचालकपदी वर्णी लावतो अशी आमिषे राहुल भगत व प्रियांका भगत यांनी दाखवली होती. ग्राहक आकर्षित होताच याच संधीचा फायदा घेत त्यांनी तब्बल 96 लाखाचा घोळ करत ग्राहकांची फसणूक केली. याप्रकरणी फसलेल्या 24 ग्राहकांनी पुढे येऊन हा घोळ पुढे आणत चिपळूण पोलीस स्थानकात दिलेल्या तक्रारीनंतर या पती-पत्नीवर 25 ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल झाला होता.
दरम्यान, गुन्हा दाखल होताच ते पती-पत्नी चिपळुणातून गायब झाले होते. त्या दोघांचा पोलीस शाध घेत असतानाच ते पुणे-हवेली येथे असल्याची माहिती मिळली. त्यानुसार त्यांना सोमवारी ताब्यात घेत अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता 2 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तसेच सध्यस्थितीत 24 ग्राहक याप्रकरणी पुढे आले असले तरी फसवणक झालेली रक्कम मोठी असल्याने आणखी काही ग्राहक पुढे येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.