रत्नागिरी : प्रतिनिधी
खेड तालुक्यातील एका गरीब कुटुंबातील महिलेला गुप्त धन मिळवून देतो असे सांगून सुमारे ₹४० लाख ९० हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या ३ भोंदू बाबांना पोलिसांनी अवघ्या ३तासात अटक केली आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मार्च २०२२ ते १७ ऑगस्ट २०२३ या कालावधीत, खेड मध्ये तीन भोंदू बाबांनी, “आपल्याकडे दैवी शक्ति असून, तुमच्या घरात गुप्तधन आहे व ते मी तुम्हाला काढून देतो आणि कोट्यवधि रुपये मिळवून देतो” असे सांगून एका गरीब महिलेला विश्वासात घेतले. तिच्या घरी, तंत्र-मंत्र , पूजा पाठ व होमहवन करण्यात आले. या सर्व गोष्टी केल्यावर या भोंदूनी त्या गरीब महिलेसह तिच्या नातेवाईकांकडून वेळोवेळी पैशांची मागणी केली. असे एकूण ४० लाख ९० हजार रुपये या भोंदू बाबांनी त्या महिलेसह तिच्या नातेवाईकांकडून उकळले.
दरम्यानच्या कालावधीमध्ये पुजा पाठ करावेच लागतील नाही तर तुमच्या घरातील दोन नातवंडांना जीवाला मुकावे लागेल अशी भीती देखील या भोंदूनी या महिलेला घातली. या महिलेने स्वत:चे सोने दागिने, राहते घर व शेत जमिनी गहाण ठेवून, बचत गटातून कर्ज काढून आपल्या मालकीचा जे.सी.बी विकून त्याद्वारे मिळालेले पैसे या तीन भोंदू बाबांना दिले. बरेच दिवस उलटून देखील गुप्तधन मिळत नसल्याने अखेर या महिलेला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले व तिने थेट खेड पोलीस ठाणे गाठले.
२९ ऑगस्ट २०२३ रोजी या महिलेच्या तक्रारीवरून खेड पोलीसांनी तपासाची चक्रे फिरवत खेड गुन्हे प्रकटीकरण शाखे मार्फत ‘अवघ्या ३ तासात’ या तीनही भोंदूना प्रसाद हरीभाउऊ जाधव (४७ , रा. गिरेवाडी, ता. पाटण, जि. सातारा) विवेक यशवंत कदम (४८, रा. करंजवडे, ता. पाटण, जि. सातारा व ओंकार विकास कदम (२३ , रा. करंजवडे, ता. पाटण, जि. सातारा) यांना गिरेवाडी व करंजवडे, ता. पाटण, जि. सातारा येथून ताब्यात घेऊन अटक केली.
या तीनही आरोपींना प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी खेड यांचे न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना ६ दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. तसेच या गुन्ह्याचा अधिक तपास खेड पोलीस ठाणे मार्फत करण्यात येत आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक नितीन भोयर, प्रभारी अधिकार, खेड पोलीस ठाणे, पोलीस उपनिरीक्षक हर्षद हिंगे, गुन्हे प्रकटीकरण शाखा प्रभारी, खेड पोलीस ठाणे, पोलीस कॉन्स्टेबल राहुल कोरे पोलीस कॉन्स्टेबल रूपेश जोगी यांनी केली.