रायगड प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील धाटाव औद्योगिक वसाहती मध्ये असलेली रोहा डाय कंपनीत आज (बुधवार) दुपारी १ वाजताच्या सुमारास अचानक आग लागल्याने औद्योगिक परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले असून या दुर्घटनेत एकाची प्रकृती चिंताजनक असून या दुर्घटनेमध्ये कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नसल्याचे समजते.
रोहा तालुक्यातील धाटाव औद्योगिक वसाहती मधील नामवंत समजल्या जाणाऱ्या रोहा डाय कंपनीत असलेल्या मटेरीयल गोडाऊनला दुपारी १ च्यासुमारास अचानक आग लागल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली ही आग नक्की कोणत्या कारणामुळे लागली याचे कारण कळू शकले नाही मात्र घडलेल्या या घटनेमुळे एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजले आहे. झालेल्या परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्नीशमन दलाला पाचारण करण्यात आले असून ही आग आटोक्यात आणण्यासाठी त्यांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
आगीच्या घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन तसेच पोलिस अधिकारी वर्ग व एम आय डी सी हद्दीतील सुरक्षा रक्षक यांनी घटनास्थळी पोहचले असून ही आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.