रत्नागिरी : प्रतिनिधी
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शिळ धरणातील जॅक वेल कोसळली आहे. मात्र आता नवीन जॅक वेल चालू करण्यासाठी सुमारे १५ ते २० दिवसांचा अवधी लागण्याची शक्यता आहे. यावर उपाय म्हणून पानवलं धरणातून व एम आय डी सी कडून पाणी घेऊन त्याचा गुरूवारी दुपार नंतर शहराला पुरवठा केला जाणार आहे असे नगर परिषदेचे मुख्याधिकारी तुषार बाबर यांनी कळवले होते. असे असले तरी शहरवासियांच्या पदरी मात्र निराशा पडली आहे. रत्नागिरी शहरातील बहुतांश भागात अद्याप पाणी पुरवठा सुरू झालेला नाही. ऐन गणेशोत्सवात नागरिकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. शहरातील नागरिकांना खासगी पाणी पुरवठा करणाऱ्यांकडून पाणी विकत घ्यावे लागत आहे.
गुरूवारी पहाटे जॅक वेल कोसळतच नगर परिषदअधिकारी, कर्मचाऱ्यांनी शिळ धरणाकडे धाव घेतली. सध्या नवीन जॅक वेल बांधून पूर्ण झाली आहे. ही नवीन जॅक वेल जरी जलद गतीने सुरु करायची म्हटली तरी १५ ते २० दिवसांचा अवधी लागू शकतो.
गणेशोत्सव लक्षात घेत राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पहाटे पाच वाजता एमआयडीसी सीईओ बिपीन शर्मा यांना सूचना दिल्या व रत्नागिरी शहराला रोज दहा एमएलडी पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला. या तातडीने घेतलेल्या निर्णयामुळे गुरुवारी दुपारनंतर रत्नागिरी शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होईल असे मुख्याधिकारी तुषार बाबर यांनी सांगितले मात्र असे असले तरीही शहरात पाणी पुरवठ्याची बोंबाबोंब झाली असून नागरिक प्रशासन लोकप्रतिनिधींच्या नावाने ऐन गणेशोत्सवात शिमगा करत आहेत.