अनेकांची कसून चौकशी; घराचा परिसर काढला खणून
रत्नागिरी प्रतिनिधी
रत्नागिरी पचांतय समितीच्या माजी सभापती स्वप्नाली सुकांत सावंत यांच्या बेपत्ता होण्याचे गुढ वाढत चालले आहे. स्वप्नाली यांचा घातपात झाल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्यानुसार पोलिसांकडून अनेकांची कसून चौकशी केली. स्वप्नाली यांच्या घराच्या परिसरात पोलिसांनी खोदकाम केले तरी स्वप्नाली यांचा ठावठिकाणा न लागल्याने त्यांच्या बेपत्ता होण्याचे गुढ वाढले आहे.
स्वप्नाली सावंत 2 सप्टेंबर 2022 पासून बेपत्ता झाल्याबाबत त्यांचे पती सुकांत सावंत यांनी रत्नागिरी शहर पोलिसांत तकार दाखल केली. मागील 9 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या स्वप्नाली यांचा घातपात झाला असल्याची शक्यता पाथमिक तपासानंतर वर्तवण्यात आली आहे. त्या संबंधी पोलिसांनी एका इसमाला ताब्यात घेतले आहे.मात्र हा इसम उलटसुलट जबाब देत पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न करत असल्याचे पुढे आले आहे.
पोलिसांकडून स्वप्नालीचे कॉल डिटेल्स प्राप्त करण्याचे काम सुरु आहे. त्यानुसार 2 तारखेपासून स्वप्नाली यांचा मोबाईल बंद झाल्याचे आढळून आले. यापूर्वी त्यांचे कुणाशी बोलणे झाले होते, त्या कुणाच्या संपर्कात होत्या, याबाबत चौकशी करण्यात येत आहे. स्वप्नाली यांचे नातेवाईक, शेजारी आदींचा जबाब पोलिसांकडून नोंदवण्यात आला असून सर्व शक्यता पडताळल्या जात आहेत.
स्वप्नाली सावंत यांचे कौटुंबिक वाद यापूर्वीही समोर आले होते. त्या संदर्भात त्यांने शहर पोलिसांत तक्रारही दाखल केली होती. घातपात होण्याची शक्यताही स्वप्नाली यांनी बोलून दाखवली होती. या घटनांचा विचार करून पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आहेत.
शुक्रवारी पोलिसांकडून स्वप्नाली सावंत यांच्या मिऱ्या येथील घरी फॉरेन्सिक पथक, श्वानपथक यांच्याद्वारे शोध घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक ड़ॉ मोहितकुमार गर्ग, उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे, शहर पोलीस निरीक्षक विनीत चौधरी तसेच पोलिसांची इतर पथकेही उपस्थित होती.