रत्नागिरी : प्रतिनिधी
समाजातील प्रत्येकाला योगा ची आवश्यकता आहे. योगा सर्वांपर्यंत पोहचवण्यासाठी, योगा ही चळवळ मिशन म्हणून राबवणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी केले. कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय, रामटेक भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र रत्नागिरी उपकेंद्र आणि महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था (एमएसएफडीए) यांच्या संयुक्त विद्यमाने २७ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट कालावधीत रत्नागिरी उपकेंद्रामध्ये “योगा फॉर होलीस्टीक हेल्थ” या विषयावर आयोजित अध्यापक विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी आयोजित कार्यक्रम ते बोलत होते.
पालकमंत्री सामंत म्हणाले, आजच्या धावपळ, तणावाच्या जीवनशैलीमध्ये योगाची सर्वांनी आवश्यकता आहे. योगाची आवश्यकता काय आहे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व जगाला दाखवून दिलेली आहे. त्यामुळे योगा संदर्भात कार्यशाळेपुरते मर्यादित न राहता याची मोठ्या प्रमाणावर जनजागृती होणे आवश्यक आहे. भावी पिढीचे शरीर स्वास्थ्य चांगले राहण्यासाठी, ते आजारमुक्त असणे यासाठी योगाशिवाय पर्याय नाही. योगा ही चळवळ म्हणून राबवणे गरजेचे आहे.
उपकेंद्राला आवश्यक ५ एकर जागा उपलब्ध करुन देण्यात येईल. अखिल भारतीय नाट्य परिषदने या विद्यापीठाबरोबर एमएयू (सामंजस्य करार) करुन कला अकादमी सुरु करण्याचा निर्णय घेण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविकपर मनोगत कुलगुरु प्रा. हरेराम त्रिपाठी यांनी केले. कार्यक्रमापूर्वी पालकमंत्री सामंत यानी कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविलय, रत्नागिरी उपकेंद्राचा आढावा घेतला तसेच अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन चर्चा केली.
यावेळी विश्वविद्यालयाचे कुलगुरु प्रा. हरेराम त्रिपाठी, महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्थेच्या केंद्र समन्वयक सुजाता वरदराजन, रत्नागिरी उपकेंद्राचे डॉ. दिनकर मराठे आदीसह अध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.