ऱाधानगरी तालुक्यातील इतर धबधबे प्रवाहित, या वर्षीपासून धबधब्याला प्रवेश शुल्क , व पार्किंग शुल्क
राधानगरी / महेश तिरवडे
कोल्हापूर जिल्ह्याच्या पर्यटन नकाशात अग्रस्थानी असणा-या राधानगरी- दाजीपुर परिसरात कोसळणा-या जिल्ह्यातील सर्वाधिक पावसामुळे हा निसर्गसंपन्न परिसर वर्षा पर्यटनासाठी नेहमीच पर्यटकांच्या पसंतीचा ठरला आहे. धुवांधार कोसळत असलेल्या पावसामुळे राउतवाडी आणि तालुक्यातील इतर धबधब्याकडे पर्यटक आकर्षित होत आहेत.
गर्द हिरवाई, अतिशय घनदाट अभयारण्य, हुडहुडी भरणारी बोचरी थंडी, वादळी वारा त्यातच सतत कोसळणारा पाऊस, दाट धुक्यातून वाट शोधत जाणारे घाट रस्ते, अनेकदा बंद होणारे मोबाईलफोन, संपर्काला येणा-या मर्यादा अशा अनेक नैसर्गिक अडचणींचा सामना करून जगणारी दाजीपुर अभयारण्य क्षेत्रातील जनता आणि जिल्ह्यात अधिक कोसळणारा पाऊस म्हणजे दाजीपुर परिसर.येथील पाऊस झेलण्यापेक्षा बघण्यातच आनंद आहे म्हणून पर्यटक केवळ पावसाळी पर्यटनासाठी येथे येत असतात.
राधानगरी म्हणजे हमखास पाऊस…. सह्याद्रीच्या उंच डोंगरातून कोसळणारे व वर्षा पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेले राऊतवाडी व रामनवाडी येथील गायकडा धबधबा, कासारवाडी धबधबा, राधानगरी, काळम्मावाडी धरण यामुळे नजरेच्या टप्प्यात दिसणारे निसर्ग सौंदर्य आणि बेभानपणे कोसळणा-या पावसाच्या सरीमध्ये ओलेचिंब होण्यासाठी पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आंबोली पेक्षाही राधानगरी पासून थोड्या अंतरावर असणा-या राऊतवाडी धबधब्याकडे पर्यटक आकर्षित होत आहेत. शनिवार, रविवार या सुट्ट्याबरोबरच शासकीय सुट्टीदिवशी पर्यटक राऊतवाडी येथे प्रचंड गर्दी करतात. पावसाच्या धारा अंगावर झेलत मनमुराद आनंद घेता घेता तालुक्यातील राधानगरी, काळम्मावाडी व तुळशी जलाशय देखील पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करतात.
यावर्षी पर्यटकांची गैरसोय होऊ नये यासाठी आम, प्रकाश आबीटकर व वन्यजीव विभाग प्रयत्नातून पर्यटन विकास निधीतून स्वागत कमान, पुरुष व महिलासाठी स्वतंत्र चेंजिंग रूम, स्वछतागृह, ,वनकर्मचारी व पोलिसांसाठी चौकी ,संरक्षक कठडा आदी विकासकामे केली आहेत, त्यामुळे यावर्षी पर्यटकांची गर्दी वाढणार आहे.
तसेच या वर्षी प्रथमच ग्रामपरिस्थिती विकास समितीच्या मार्फत लहान मुलांना पाच रुपये व महिला व पुरुष यांना दहा रुपये प्रवेश शुल्क आकारले जाणार आहे, या मिळालेल्या निधीतून धबधब्याची स्वच्छता, प्लॅस्टिक व इतर कचरा गोळा करणे, दुरुस्ती व देखभाल, स्वच्छतागृहात विजेची सोय, ग्रामपरिस्थिती विकास समितीच्या वतीने नेमण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचा पगार आदींचा समावेश असणार आहे,तसेच पार्किंग साठी मोटारसायकल 10 रुपये व चार चाकी वाहनांस 20 रुपये आकारण्यात आले आहेत.
जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील पर्यटक हा राऊतवाडी धबधबा पहाण्यासाठी येत असतात, काही अति उत्साही युवक मद्यपान करून नृत्य करणे, मोटारसायकल वेगाने चालवणे, कड्यावरून डोकावून पहाणे, वाहनांची कोंडी करणे असे प्रकार करू नये, जेणेकरून स्थानिक नागरिकांना याचा त्रास होऊ नये याची जाणीव ठेवून पर्यटकांनी धबधब्याचा आंनद लुटावा, यासाठी स्थानिक ग्रामपरिस्थिती विकास समिती व पोलीस प्रशासनास सहकार्य असे आवाहन वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे,