ऑनलाईन टीम/तरुण भारत
खासदार नवनीत राणा (navneet rana) आणि आमदार रवी राणा (ravi rana) या दोघांनाही वांद्रे कोर्टाने १४ दिवसांची न्यायलयीन कोठडी सुनावली आहे. यावेळी कोर्टाने रानाच्या जामिनावर तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला. या प्रकरणातील जामीन अर्जावर सुनावणी ही येत्या २९ तारखेला होणार आहे. यावेळी कोर्टानं रवी राणा यांची अर्थररोड कारागृहात तर नवनीत राणा यांची भायखळा कारागृहात रवानगी केली. राणा दांपत्याला न्यायलयीन कोठडी सुनावल्यानंतर नवनीत राणा यांचे पहिले ट्विट समोर आले आहे. हनुमान चालीसा वाचणे पाप आहे का ? असा सवाल नवनीत राणा यांनी ट्विटच्या माध्यमातून केला आहे. तर हनुमान चालीसा पठण करणे हा गुन्हा असेल तर आम्हाला फाशी द्या अशा स्वरूपात नवनीत राणा यांनी आपल्या भावना ट्विटच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत.
काय आहे नवनीत राणा यांचे ट्विट ?
हनुमान चालीसा वाचणे पाप आहे का? कलम १२४ (अ) अंतर्गत जन्मठेपेची शिक्षा लावा.. देशातील जनतेला आमचा प्रश्न आहे की हनुमान चालीसा पाठ करणे गुन्हा आहे. असेल तर आम्हाला फाशी द्या..
राणा दाम्पत्याला का केली होती अटक ?
खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर हनुमान चालिसाचे (Hanuman chalisa) पठण करणार असल्याचे सांगितले. यानंतर राज्यात चांगलेच वातावरण तापले. काल राणा दाम्पत्यांना अटक केली होती.
नवनीत राणा आणि रवी राणा यांच्याविरोधात मुंबईतल्या खार पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानतंर शनिवारी दुपारी खार पोलीस राणा दाम्पत्याच्या घरी दाखल झाले. यावेळी राणा दाम्पत्याने पोलिसांशी हुज्जत घातली. पण पोलिसांनी नवनीत राणा आणि रवी राणा यांना ताब्यात घेत पोलीस स्थानकात नेलं.