खासदार धैर्यशील मानेंनी गत निवडणुकीतील पैरा फेडावा
कोल्हापूर प्रतिनिधी
हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील जागा रयत क्रांती संघटना लढवणार असून आपण स्वत: उमेदवार असणार असे माजी मंत्री व रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी गुऊवारी पत्रकार परिषदेत जाहीर केले. तसेच गेल्या निवडणुकीतील मदतीचा पैरा खासदार धैर्यशील माने यांनी फेडावा, असे आवाहनही त्यांनी केले. दरम्यान मराठा व धनगर आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने भूमिका स्पष्ट कऊन संभ्रम दूर करावा, अशी मागणही त्यांनी केली. शासकिय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
हेही वाचा >>>>ऊस निर्यातबंदीचा निर्णय सरकारला रद्द करायला भाग पाडले- माजी मंत्री सदाभाऊ खोत
हातकणंगले लोकसभा मतदार संघातून गेल्यावेळी आपण निवडणूक लढविण्याची तयारी केली होती. त्या दृष्टीने मतदारसंघही पिंजून काढला होता. एकप्रकारे जमिनीची मशागतच आपण केली होती. परंतु पक्षादेशानुसार आपण महायुतीचे उमेदवार खासदार धैर्यशील माने यांच्यामागे सर्व ताकद लावून त्यांना निवडून आणले, परंतु आता आपण स्वत: या मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक असून हा मतदारसंघ रयत क्रांतीला सोडावा अशी मागणी करणार आहे, असे खोत यांनी स्पष्ट केले.
प्रस्थापित मराठा नेत्यांनीच गरीब मराठा समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवल्याचा आरोप माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केला. ग गेल्या 50 वर्षात तुमच्या हातात सत्ता होती, तसेच गेल्या अडीच वर्षातही महाविकास आघाडीचे सरकार होते मग का नाही दिले आरक्षण ? तेव्हा काय गोट्या खेळायला व पत्ते खेळायला गेला होता का ? असा सवालही माजी मंत्री खोत यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांचे नाव न घेता त्यांना केला.मराठा आणि धनगर आरक्षणासह ओबीसी आरक्षणाच्या आंदोलनाचा राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी वापर होत आहे. आरक्षणाच्या नावाखाली धुमाकूळ सुरू असून हे चिंताजनक आहे. त्या पार्श्वभूमीवर मराठा आणि धनगर आरक्षण देणं शक्य आहे का, याबद्दलची खरी माहिती समाजाला मिळाली पाहीजे. त्यासाठी राज्य शासनानं आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही माजी मंत्री खोत यांनी केली.
तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं. मुंबई उच्च न्यायालयात मराठा आरक्षण टिकलं. परंतु मराठा समाजातील प्रस्थापित नेत्यांच्या राज्यात अडीच वर्ष सत्ता असताना, हे आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकविता आलं नाही. प्रस्थापित मराठा नेत्यांनी मराठा समाजाला आतपर्यंत आरक्षण का दिलं नाही. याचं उत्तरं दिली पाहीजे. जातीय आरक्षण देण्याचा निर्णय राज्य शासनान स्वतंत्रपणे घेवू शकत नाही आणि आरक्षण म्हणजे बाजारातील भाजीपालाही नाही, असा टोला खोत यांनी लगावला. त्याचबरोबर मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण दिल्यास ओबीसी समाज न्यायालयात जाईल. धनगर समाजाला आदिवासीचं आरक्षण दिल्यास आदिवासी समाजही न्यायालयात जाईल. त्यामुळं आरक्षणाचा प्रश्न भिजत पडण्याची शक्यता आहे, असेही त्यांनी सांगितले.
राजू शेट्टी हे कार्यकर्ते कुजविणारे नेतृत्व
नेतृत्व करणार्यांकडं दातृत्व, मातृत्व आणि पितृत्वाचे गुण असावे लागतात. पण स्वाभिमानीचं नेतृत्व हे कुजके असून ते आपल्यापेक्षा कोणी मोठे होऊ नये म्हणून इतर कार्यकर्त्यांना जाणीवपूर्वक कुजवत ठेवते, अशी बोचरी टीका खोत यांनी राजू शेट्टी यांच्यावर केली.
तुपकरप्रश्नी जालिंदर पाटीलांनी शेपूट का घातली ?
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्यावर कारवाईसाठी नेमलेली शिस्तपालन समितीने अजून निर्णय दिलेला नाही. ही समितीच बेशिस्त असून या समितीतील प्रा. जालिंदर पाटील यांनी तुपकर यांच्यावर कारवाई न करता शेपूट का घातली ? अशी विचारणाही खोत यांनी केली.
धमकी देणार्या मादनाईक यांनी आपला इतिहास तपासावा
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सभेत सदाभाऊंना कोल्हापूर जिह्यात फिऊ देणार नाही, असा इशारा सावकार मादनाईक यांनी दिला होता. याबाबत विचारले असता खोत म्हणाले, मी काही शांती आणि जप करणारा माणूस नाही तर लढणारा मराठा कार्यकर्ता आहे. त्यामुळे अशा धमक्यांना मी घाबरत नाही. तसेच धमकी देणार्यांनी आपला इतिहास तपासावा, स्वत:च्या विधानसभा निवडणुकीवेळी त्यांना सभा घेण्याचे धाडस नव्हते, त्यांचे हातपाय कापत होते, त्यावेळी आपण जाऊन या सभा घेतल्या हे मादनाईक यांनी लक्षात ठेवावे, असा टोलाही त्यांनी हाणला.