पदव्युत्तर प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचे हाल : शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता
बेळगाव : राणी चन्नम्मा विद्यापीठ (आरसीयू) ने 2022-23 या शैक्षणिक वर्षात घेतलेल्या वार्षिक सेमिस्टरच्या परीक्षांचा निकाल अद्याप जाहीर केलेला नाही. मूल्यांकन प्रक्रिया उशिरा झाल्याने विद्यार्थी अडचणीत सापडले आहेत. निकाल नसल्याने विद्यार्थ्यांना पदव्युत्तर व बीएड् प्रवेशासाठी अर्ज करता येत नसल्याने विद्यार्थ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे. आरसीयू अंतर्गत बेळगाव, विजापूर व बागलकोट जिल्ह्यातील 430 महाविद्यालयांमध्ये 50 हजार विद्यार्थ्यांनी सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात शेवटच्या सत्राची परीक्षा दिली होती. परीक्षा होऊन दीड महिना झाला तरी निकाल देण्यात आलेला नाही. कोरोना काळात सर्व यंत्रणा बंद असतानाही विद्यापीठाने ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात निकाल जाहीर केले होते. त्यामुळे आताच का वेळ होत आहे, असा प्रश्न विचारण्यात येत आहे.
प्रशासनाचा भोंगळ कारभार समोर
कर्नाटकातील म्हैसूर विद्यापीठ, कर्नाटक विद्यापीठ, दावणगेरी विद्यापीठाने निकाल जाहीर केले असून, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेलाही सुरुवात केली आहे. पदव्युत्तर प्रवेशासाठी 20 नोव्हेंबर तर बीएड् प्रवेशासाठी 19 नोव्हेंबर अंतिम तारीख आहे. असे असताना आरसीयूकडूनच विलंब होत असल्याने विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी अर्ज करता येत नाहीत. यामुळे प्रशासनाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे.
मूल्यमापनास विलंब का?
दुसऱ्या, चौथ्या व सहाव्या सत्राच्या उत्तर पत्रिका मूल्यमापनासाठी बेळगावमध्ये चार सेंटर आहेत. यावेळी अतिथी प्राध्यापकांनाही मूल्यमापनाची जबाबदारी दिली आहे. परंतु उत्तर पत्रिकांची संख्या पाहता मूल्यमापन करणाऱ्यांची संख्या अत्यल्प आहे.