वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांचा चतुर्थीनिमित्त गोमंतकीय जनतेला संदेश
जगन्नाथ मुळवी /मडकई
गणेश चतुर्थी हा चेतना, स्फूर्ती व भक्तांची मनोकामना पूर्ण करणारा पारंपारिक उत्सव आहे. दीड दिवस ते अनंत चतुर्दशीपर्यंत हा उत्सव भक्तीभावाने साजरा करीत असतात. या काळात प्रत्येक भक्ताने घराघरातून अथर्वशिर्ष्याचे पठण करणे आवश्यक आहे. संकटनाशक स्तोत्र, गणेश मंत्र अथवा नामस्मरण दररोज केल्यास त्याचे योग्य व अपेक्षित फळ निश्चीत प्राप्त होत असते. सर्वांच्या जिवनात परमानंद आणणाऱ्या या गणेश चतुर्थी उत्सवाला अनन्य साधारण महत्त्व असल्याचे वीजमंत्री तथा मगो पक्षाचे नेते सुदिन ढवळीकर यांनी सांगितले.
अथर्वशिष्य पठण केल्यास नकारात्मक शक्ती लोप पावून सकारात्मक उर्जा मिळते. दुर्वा वाहून एक हजार आठ आवर्तने केल्यास त्याचे फळ प्राप्त होत असते. पुराणातील गणकऋषींनी अथर्वशिष्य लिहिताना हे स्पष्ट केले आहे. निसर्गदेवता म्हणून आपण गणपतीकडे पाहत असतो. त्यानिमीत्ताने निसर्गाचे पुजन होते व माटोळीच्या माध्यामातून अनेक फळांची व वनस्पतींचा परिचय माणसाला होत असतो. कुठल्याही माणसावर संकट आले असल्यास गणेशाच्या नावाच्या मांदीयाळीचे संकटनाशक स्तोत्र पठण करण्यास सांगितले आहे. चौसष्ट कला, शक्ती, विद्या व बुद्धिचा दाता असलेला श्री गणेश माणसांच्या जिवनाला दिशा देत असतो. शुद्ध आचार विचाराने त्याचे पुजन केले जाते. गोमंतकीय माणूस आतुरतेने या सणउत्सवाची वाट पाहत असतात. गणेश चतुर्थी हा एकच असा उत्सव आहे की, त्याच्या पुजनासाठी गरीबापासून श्रीमंतापर्यत सर्वच आपापल्यापरीने त्याच्या आगमनासाठी घर सजवतात. रांगोळी व पताका लावून त्याचे स्वागत करतात.
मातीपासून तयार केलेले लोकवाद्य घुमट हे त्याचे आवडते वाद्य आहे. रामदास स्वामींना स्फुरलेली सुखकर्ता दु:खहर्ता ही आरती याच घुमटांवर वाजवून त्याला प्रसन्न करुन घेतात. कुठल्याही धार्मिक कार्याची सुरुवात त्याच्या अग्रपुजेने केली जाते. सनातत संस्कृतीत गणेशाचे स्थान हे अग्रक्रमाचे आहे. कामानिमीत्त विखुरलेल्या सर्व माणसांना एकत्रीत करण्याचे महत्कार्य गणपती करीत असतो. आणि म्हणूनच सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात लोकमान्य टिळकांनी केली होती. गपणतीच्या आरतीनंतरच शंकराची लवथवती व दुर्गेदुर्घट भारी ही देवीची आरती म्हटली जाते. म्हणूनच त्याचे महत्त्व अनन्य साधारण असल्याचे ते सांगतात.
पाच पिढ्या लोटल्या तरी ढवळीकर कुटुंबियांनी त्यांची आरास बदललेली नाही. त्या आरासात व्यवस्थीत बसणारी श्री गणेशाची मूर्ती मंत्रपुष्पांजलीतून पुजली जाते. वार्षिक पाच दिवसांचा गणपती त्यांच्याकडे असल्याचे मंत्री सुदिन ढवळीकर यांनी सांगितले. घरातील सर्व मंडळी एकत्रीत बसून त्याची आरती व महिमा गातात. महालक्ष्मीच्या कृपेने घराजवळच तळी असल्याने त्याच तळीत पाचव्या दिवशी यथोचित गणपतीचे विसर्जन केले जाते. गोमंतकीयांची सर्व दु:खे व समस्या श्री गणेशाने दूर करावीत अशी आपली नेहमीच अथर्वशिर्षपठणाने प्रार्थना असते….!