वृत्तसंस्था/ बार्सिलोना, स्पेन
दोन वेळचा वर्ल्ड चॅम्पियन रेड बुलच्या मॅक्स व्हर्स्टापेनने स्पॅनिश ग्रां प्रि फॉर्म्युला वन शर्यतीचे जेतेपद पटकावले. पोल पोझिशनवरून सुरुवात करून अखेरपर्यंत वर्चस्व कायम राखत त्याने हे यश मिळविले. ड्रायव्हर्स चॅम्पियनशिप रेसमध्ये तो आता जवळच्या प्रतिस्पर्ध्यापेक्षा 53 गुणांनी पुढे आहे. मर्सिडीजच्या लेविस हॅमिल्टनने दुसरे व त्याचाच सहकारी जॉर्ज रसेलने तिसरे स्थान मिळविले.
व्हर्स्टापेनचा संघसहकारी सर्जिओ पेरेझने चौथे, फेरारीच्या कार्लोस सेन्झने पाचवे, अॅस्टन मार्टिनच्या लान्स स्ट्रोलने सहावे, अॅस्टन मार्टिनच्या फर्नांडो अलोन्सोने सातवे, अल्पाईनच्या इस्टेबन ओकॉनने आठवे, अल्फा रोमिओच्या झोयू ग्वानयूने नववे, अल्पाईनच्या पियर गॅसलीने दहावे स्थान मिळविले. कन्स्ट्रक्टर चॅम्पियनशिपमध्ये रेड बुलने 287 तर मर्सिडीजने 152 गुण मिळविले आहेत.