पाणी टंचाई कमी करण्यासाठी नदीजोड प्रकल्पाला केंद्राकडून मदत मिळावी तसेच गोवा आणि गुजरात राज्याला जोडण्यासाठी महाराष्ट्रात बांधण्यात येत असलेल्या कोस्टल रोडचा विस्तार व्हावा अशी इच्छा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे. सोमवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत बोलताना मुख्यमंत्र्यांनी ही इच्छा बोलून दाखवली. पुढे बोलताना रायगडमधील रेवस, रत्नागिरीतील रेड्डी, गोवा आणि गुजरातमधील पर्यटन विकासासाठी कोस्टल हायवे बांधण्याचीही गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.
गुजरातमधील गांधीनगर येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली 26 व्या पश्चिम विभागीय परिषद संपन्न झाली. या बैठकीत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्य महाराष्ट्रातील पाणी टंचाई कमी करण्यासाठी नदीजोड आणि मराठवाडा ग्रीड प्रकल्पांना गती देण्यासाठी केंद्राकडून मदत मागितली. तसेच कांद्याच्या घसरलेल्या किमतीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी राज्यात कांदा खरेदी केंद्रे वाढवण्याचीही अमित शहा यांच्याकडे केली आहे.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, “महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत राज्यातील तीन किनारी प्रदेशातील जिल्ह्यांमध्ये तयार होत आलेल्या कोस्टल रोडच्या विस्तार होणे गरजेचे आहे. या विस्तारामुळे किनारी प्रदेशातील तीन राज्यांतील पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे. या राज्यांमध्ये किनारी सुरक्षा राखण्यासाठी देखील याचा फायदा होईल.”असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 498 किमी लांबीच्या या कोस्टल हायवेसाठी 9, 500 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तसेच राज्यातील विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. तसेच गुजरात आणि गोव्याचे मुख्यमंत्री आणि दादरा, नगर हवेली आणि दमण आणि दीवचे प्रशासकही उपस्थित होते.